वाहतुक नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांकडून १ कोटी ४६ लाखांचा दंड वसुल
By अजित मांडके | Published: December 12, 2023 04:42 PM2023-12-12T16:42:47+5:302023-12-12T16:43:14+5:30
लोकआदलतीमुळे ९ दिवसात वाहन चालकांकडून मिळाला प्रतिसाद.
अजित मांडके,ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºयांच्या विरोधात ठाणे वाहतुक पोलिसांनी ई - चलनाद्वारे कारवाई केली जाते. मात्र असे असतांनाही वाहन चालक मात्र दंडाची रक्कमच भरत नसल्याचे निर्दशनास आले होते. त्यामुळे वाहतुक पोलिसांनी दंडाची रक्कम ३० ते ५० टक्के कमी केली होती. याशिवाय ही रक्कम वसुल करण्यासाठी लोकअदालतच्या माध्यमातून नोटीस पाठविण्यात आली होती.
वाहतुक पोलिसांनी उचलेल्या या पावलामुळे अवघ्या ९ दिवसात १ कोटी ४६ लाख ६० हजार २५० रुपयांचा दंड जमा झाल्याची माहिती वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. येत्या फेब्रुवारीमधील लोक अदालतीसाठी अशाचपद्धतीची मोहीम राबविली जाणार असल्याचे वाहतुक पोलिसांनी सांगितले.
ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरात वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाºयांच्या विरोधात वाहतुक पोलिसांकडून ई चलनाद्वारे कारवाई केली जाते. या ई चलनाद्वारे वाहन चालकांना केव्हांनी दंडाची रक्कम भरण्याची सवलत असते. मात्र वाहन चालक त्याकडे दुर्लक्ष करीत असता. परंतु त्यामुळे चालकाकडून पुन्हा वाहतुक नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडाच्या रकमेतही वाढ होत असते. या थकित दंडाची रक्कम वसूल करताना ठाणे पोलिसांच्या नाकी नऊ आले आहेत. आयुक्तालय क्षेत्रात ३१ लाख ७१ हजार हून अधिक वाहनांवर कारवाई केली आहे. परंतु थकित दंडाची रक्कम १९८ कोटी रुपयांच्या घरात आहे. अशा चालकांविरोधात खटला दाखल केला जातो. यातील अनेक प्रकरणे प्रलंबित राहतात. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या लोक अदालतीच्या माध्यमातून ही प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येतात. सुमारे महिन्याभरापूर्वी लोक अदालतीच्या पार्श्वभूमीवर मुख्य न्यायदंडाधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, दिवाणी न्यायाधीश, पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांची एक बैठक झाली.
त्यानंतर अशा खटल्यात तडजोड घडवून आणण्यासाठी मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यासाठी ठाणे वाहतुक शाखेच्या तीन हात नाका येथील कार्यालयात मदत केंद्र सुरू करण्यात आले. या मदत केंद्रास थकित दंड असलेल्या वाहन चालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. वाहतुक पोलिसांनी या मोहिमेच्या माध्यमातून ३८ लाख २ हजार १०० रुपयांचा दंड जमा केला. तर लोक अदालतीच्या माध्यमातून १ ते ९ डिसेंबर या कालावधीत पाठविण्यात आलेल्या चालकांना नोटीस पाठविल्यामुळे १ कोटी ८ लाख ५८ हजार १५० रुपयांचा दंड जमा झाला. अशाप्रकारे एकूण १ कोटी ४६ लाख ६० हजार २५० इतका महसूल गोळा करण्यास वाहतुक पोलिसांना यश आले आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये देखील मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी वाहन चालकांनी संबंधित परिसरातील वाहतुक कक्षाच्या कार्यालयात १५ जानेवारीनंतर संपर्क साधावा. त्यांच्या थकित दंडाच्या रक्कम कपात केली जाईल असेही राठोड यांनी स्पष्ट केले.