मीरारोडमध्ये एक कोटीचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 08:47 PM2018-05-29T20:47:23+5:302018-05-29T20:47:23+5:30
सर्व्हिस मार्गावर गुटख्याने भरलेल्या ५ बोलेरो पिकअप व्हॅन उभ्या असल्याचे त्यांना खबऱ्याने सांगितले.
मीरारोड - मीरारोड मध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या ५ वाहनांमधून तब्बल १ कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय. ठाणे ग्रामीण पोलीसांनी केलेल्या या कारवाईत गुटख्या सह ५ वाहनं जप्त केली आहेत.
राज्यात बंदी असली तरी गुजरात भागातुन चोरट्या मार्गाने गुटखा आणला जातो. काशिमीरा हद्दीतुन गुटखा मुंबईला पुरवला जातो. तर या आधी काशिमीरा भागात गुटखा साठ्याची गोदामं सुध्दा सापडली होती. मीरारोड मध्ये तर गुटखा बनवुन पॅकिंगचा कारखानाच एका सदनिकेतुन चालत असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे शहरात गुटख्याची चोरटी वाहतुक , साठा रोखण्यासाठी पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी स्थानिक पोलीसांना वेळोवेळी कारवाईचे आदेश दिले होते.
सहाय्यक पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना सोमवारी मध्यरात्री नंतर गुटख्याच्या साठ्याची माहिती मिळाली. प्लेझेंट पार्कच्या भारती टॉवर, डॉन बॉस्को शाळेसमोरच्या सर्व्हिस मार्गावर गुटख्याने भरलेल्या ५ बोलेरो पिकअप व्हॅन उभ्या असल्याचे त्यांना खबऱ्याने सांगितले.
कुलकर्णी यांनी डॉ. पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शना खाली आपल्या पथकासह काशिमीरा पोलीसांना सोबत घेऊन त्या पाच ही मालवाहु गाड्या ताब्यात घेतल्या. गाडीचे चालक वगेरे कोणच नव्हते. गाड्यांची टाळी उघडली असता गुटख्याचा मोठा साठा आढळुन आला. चार गाड्यांमध्ये गोवा गुटखा तर एका गाडीत वजीर गुटख्याचा साठा सापडला.
तब्बल ३६८ गोणी भरुन हा गुटख्याचा साठा असुन त्याची बाजारातली किंमत ९९ लाख ६६ हजार ७५० रुपये इतकी आहे. गाडीचे चालक आदी कोणीच सापडले नसल्याने गुटखा आणला कुठुन व कोणी हे तपासा नंतरच सांगता येईल. सध्यातरी गुटख्याचा साठा हा अन्न व औषध प्रशासनाच्याअन्न अन्न सुरक्षा अधिकारी डि.झेड. तोत्रे यांच्याकडे पुढील कार्यवाही साठी सुपूर्द केला आहे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास हांडोरे यांनी सांगीतले.