भिवंडी तालुक्यात आढळली ३८ अतितीव्र कुपोषित बालके

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 12:05 AM2020-03-13T00:05:27+5:302020-03-13T00:05:48+5:30

वीटभट्टी कामगारांच्या मुलांना बाधा : २७१ बालकांची नोंद झाल्याने चिंता वाढली

1 Extremely malnourished child found in Bhiwandi taluka | भिवंडी तालुक्यात आढळली ३८ अतितीव्र कुपोषित बालके

भिवंडी तालुक्यात आढळली ३८ अतितीव्र कुपोषित बालके

Next

नितीन पंडित

भिवंडी : भिवंडी तालुक्यात कुपोषित बालकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, तालुक्यात २७१ कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. बालकांच्या कुपोषण नियंत्रणावर कोट्यवधींचा खर्च करूनही कुपोषणाची व्याप्ती रोखण्यात शासनाला अपयश आल्याने शासनाची उदासीनता उघड झाली आहे.

भिवंडीत मागील काही दिवसांपूर्वी वीटभट्टी कामगाराच्या अतितीव्र कुपोषित मुलीला उपचारासाठी उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केल्याने बालकांच्या कुपोषणाचा धक्कादायक प्रकार उघड झाला. मात्र, या प्रकारानंतरही भिवंडीतील कुपोषण रोखण्यात यश आलेले नाही. उलटपक्षी तालुक्यातील बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण वाढतच चालले आहे. आजच्या घडीला तालुक्यात ३८ अतितीव्र कुपोषित बालकांची, तर २३३ मध्यम कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यात अतितीव्र व मध्यम कुपोषित बालकांची एकूण संख्या २७१ झाली असल्याची माहिती भिवंडी बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी कोरे यांनी दिली.

भिवंडी तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत सुरू असलेल्या बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. गरोदर व स्तनदा माता तसेच लहान बालकांना घरपोच पोषण आहारामध्ये धान्यपुरवठा करणे, तसेच तीन ते सहा वर्षे वयाच्या बालकांना ताजा आहार देणे, स्तनदा व गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेणे, सहा वर्षे वयोगटातील मुलांना आठवड्यातून चार दिवस अंडी व केळी यांसारखे खाद्यपदार्थ देणे, त्यांची वजन व उंची तपासणे, आरोग्य विभागामार्फत लसीकरण मोहीम राबविणे, अशी विविध कामे अंगणवाडीच्या सेविकांमार्फत करणे गरजेचे आहे.

मात्र, या सेविकांपर्यंत ही कोणतीही साधने वेळेवर पुरवली जात नसल्याची बाब अंगणवाडी सेविकांनी वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. अनेक अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी सेविका कुपोषित मुलांना पोषक आहार स्वखर्चाने देतात. मात्र, या अंगणवाडी सेविकांचा पगार तुटपुंजा असून तोही वेळेवर होत नसल्याने कुपोषण निर्मूलनात मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाच्या निदर्शनास या बाबी आणूनही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कुपोषण निर्मूलनाबाबत मोठी समस्या निर्माण झाली आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या दिवा-अंजूर, कोन, खारबाव, पडघा, अनगाव, दाभाड, वज्रेश्वरी, चिबीपाडा अशा आठ प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत २२७ वीटभट्टी कामगारांच्या मुलांची नोंद असून, स्थलांतरित कुटुंब संख्या सहा हजार १८० इतकी आहे. तालुक्यातील ५५ गावे व आदिवासी पाड्यांमध्ये ही अतितीव्र कुपोषित बालके आढळून आली असल्याचा अहवाल बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी शासनास पाठवला आहे.

कुपोषण निर्मूलन योजनेत गैरव्यवहार?
सरकार कुपोषित बालकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते; परंतु कोणत्याही योजनांचा लाभ वीटभट्टीवर काम करणाºया कामगारांपर्यंत पोहोचत नसल्याची धक्कादायक कबुली पालक वेळोवेळी देत असल्याने कुपोषण निर्मूलन योजनेत गैरव्यवहार होत असल्याची शंका घेण्यास वाव असल्याचे वीटभट्टी कामगारांचे म्हणणे आहे.

Web Title: 1 Extremely malnourished child found in Bhiwandi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.