दुकानातील नोकरानेच लुबाडली एक लाख ४० हजारांची रोकड
By जितेंद्र कालेकर | Published: August 17, 2023 07:29 PM2023-08-17T19:29:58+5:302023-08-17T19:30:02+5:30
श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा: चोरी केल्यानंतर उत्तर प्रदेशात पलायन
ठाणे- किसननगर क्रमांक एक भागात नदीमउद्दीन शेख (४४) यांच्या एस. के. ट्रेडर्स या होलसेल सामान विक्रीच्या दुकानातून त्यांच्याच एका नोकराने एक लाख ४० हजारांची रोकड चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शेख यांनी चोरीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी दिली. या घटनेनंतर नोकराने पलायन केले असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
किसननगर येथील शेख यांच्या एस. के. ट्रेडर्स या साबण तसेच इतर सामान विक्रीच्या दुकानामध्ये मुळचा उत्तरप्रदेशातील आजिम खान शफी अहमद हा १७ जुलै २०२३ पासून कामाला आहे. तो सामानाची डिलेव्हरी तसेच दुकानाचे माल वगैरे भरण्याचे काम करीत होता. त्याच्या सोबत इतर चार मुलेही कामाला आहेत. दुकानात काम करणाऱ्या या चारही मुलांना राहण्यासाठी शेख यांनी एक खोलीही भाडयाने घेउन दिली होती. अजिम खान हा १२ आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास भाडयाने वास्तव्याला असलेल्या खोलीत आंघाेळीसाठी जातो, असे सांगून त्या खोलीची चावी त्याने तहजिब हुसेन या अन्य एका मुलाकडून घेतली.
आंघाेळीनंतर तो दुपारी १२.१० वाजण्याच्या सुमारास दुकानात आला. त्यानंतर तो पडवळनगर येथील घरपाेच डिलीव्हरी देण्यासाठी दुकानातून किराणामालाचे साहित्य घेऊन गेला. त्यानंतर तो दुकानात परत आलाच नाही. तो भाडयाने वास्तव्याला असलेल्या खोलीमध्येही नव्हता. दुसऱ्या चावीने तहजीब याने खोलीचे कुलूप उघडले. तेंव्हा दुकानाच्या व्यवहाराची एक लाख ४० हजारांची रक्कम असलेली बॅगही तिथे नव्हती. काही दिवस शेख यांनी त्यांची परत येण्याची वाट पाहिली. तो अखेर न परतल्यामुळे याप्रकरणी त्यांनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक किशोर बोडके हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.