बनावट कागदपत्रांच्या आधारे एक लाख ९८ हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:40 PM2019-01-21T22:40:19+5:302019-01-21T22:49:03+5:30
बुलडाणा येथील डॉ. प्रदीप डाबेराव यांची एक लाख ९८ हजारांची फसवणूक करणाऱ्या पृथ्वी अमिन याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. संकेतस्थळावर जाहिरात देऊन कारची बनावट कागदपत्रांद्वारे विक्री करुन एका भामटयाने ही फसवणूक केली.
ठाणे : संकेतस्थळावर खासगी साइटवर जाहिरात देऊन कारची बनावट कागदपत्रांद्वारे विक्री करून बुलडाणा येथील डॉ. प्रदीप डाबेराव यांची एक लाख ९८ हजारांची फसवणूक करणा-या पृथ्वी अमिन याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दंतचिकित्सक डॉ. डाबेराव यांचा उंद्री (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथे दवाखाना आहे. नेहमीच बाहेरगावी जावे लागत असल्यामुळे त्यांना जुनी कार खरेदी करायची होती. त्यासाठी ओएलएक्स या इंटरनेट साइटवर अशा कारचा ते शोध घेत होते. त्याचवेळी त्यांना एका टोयोटो कारची जाहिरात पाहायला मिळाली. २०१६ चे मॉडेल असलेल्या या कारची किंमत तीन लाख ७५ हजार रुपये दाखवण्यात आली होती. ती पसंत पडल्याने त्यांनी या कारच्या मालकाशी ओएलक्सच्या खात्यावर संपर्क साधला. २७ डिसेंबर २०१८ पासून त्यांच्यात या व्यवहाराची बोलणी सुरूझाली. पृथ्वी अमिन असे आपले नाव सांगणाºया या व्यक्तीने आपण ठाण्यातील आर मॉल येथील एका कॉल सेंटरमध्ये नोकरीला असल्याचे सांगितले. नंतर, या गाडीची किंमत त्याने दोन लाख ७५ हजार रुपये सांगून ती ३१ डिसेंबर २०१८ पूर्वी विक्री करायची असून पैसे रोखीमध्ये घेणार असल्याचेही सांगितले. ही गाडी घेण्यासाठी त्याने त्यांना ३१ डिसेंबर रोजी ठाण्यात बोलवले. ठाण्याच्या घोडबंदर रोडवर डॉ. डाबेराव हे त्यांचे मित्र स्वप्नील कोतवाल, मेकॅनिक अमोल गुजर हे दुपारी १२.४५ वा. पोहोचले. तिथे आर मॉलसमोर पृथ्वी याने ग्रे रंगाची इटिओस लिव्हा ही कार दाखवली. ती योग्य वाटल्यानंतर कागदपत्रे पाहून त्याला एक लाख ९८ हजार रुपये दिले. ती कार घेऊन ते १ जानेवारी २०१९ रोजी बुलडाणा येथे पोहोचले. त्यांनी जमा केलेली कारची कागदपत्रे बनावट असल्याचे ठाणे आरटीओ कार्यालयाकडून त्यांना काही दिवसांनी समजले. त्यानंतर, त्यांनी ७ जानेवारी रोजी ठाण्यातील पृथ्वीचा शोध घेतला. मात्र, त्याचा पत्ता आणि कागदपत्रेही बनावट आढळली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात २० जानेवारी रोजी एक लाख ९८ हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.