CoronaVirus News: परराज्यांतून येणारे १० टक्के मजूर बाधित; कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 11:47 PM2020-09-10T23:47:36+5:302020-09-11T06:39:07+5:30
सर्व रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये भरती
ठाणे : कोरोनाच्या संसर्गाला घाबरून ठाण्यातून पलायन केलेले परप्रांतीय मजुरांचे लोंढे आता पुन्हा ठाण्यात परतू लागले आहेत. या मजुरांची ठाणे महानगरपालिकेकडून आरोग्यतपासणी केली जात आहे. याअंतर्गत गेल्या दोन दिवसांत ठाणे रेल्वेस्थानकाबाहेर केलेल्या एक हजारांहूनअधिक प्रवाशांच्या तपासणीत १०० जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले आहे. ठेकेदारांनी कामासाठी पुन्हा बोलाविले आहे. ठाणे, मुंबईसारख्या शहरांकडे त्यांचा प्रवास सुरू झाल्याने या शहरांना पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागणार असल्याची भीती आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
मार्च महिन्यात ठाण्यात वसंतविहार या उच्चभ्रू वसाहतीत पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता. त्यानंतर, सर्वच बाजूंनी ठाण्यावर कोरोनाचा प्रहार झाला. रोज सरासरी ४००-५०० रुग्ण आढळत होते. सर्वत्र कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात होती. तरीही, संसर्गाच्या भीतीने परराज्यांतील मजूर, असंघटित कामगार आणि फेरीवाल्यांनी ट्रक, रिक्षा, टेम्पो, बस, मोटारसायकल अशा मिळेल त्या वाहनाने आणि अनेकांनी पायीदेखील ठाण्यातून पलायन केले. बांधकाम आणि कंपनीत ठेकेदारी पद्धतीवरील कामगारांना पोसण्यास ठेकेदारांनी असमर्थता दाखविल्याने त्यांना सरकारने रेल्वे आणि एसटीने घरी पाठवले होते.
आता ठाणे आणि मुंबईत कोरोना नियंत्रणात येऊ लागला आहे. मुंब्रा, दिवा यासारख्या प्रभागात तर नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण शून्यावर आले. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्याने परराज्यांत गेलेले लोक पुन्हा ठाण्यात येऊ लागले आहेत. त्यांच्यासाठी केंद्राकडून विशेष रेल्वे सोडल्या आहेत. त्यामुळे रोज मजुरांचे लोंढे ठाणे, कल्याणसह मुंबईतील रेल्वेस्थानकांवर उतरत आहेत. या परप्रांतीयांमधील एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरातील गर्दीमध्ये मिसळू नये, यासाठी ठाणे महानगरपालिकेने कंबर कसून ठाणे रेल्वेस्थानकात त्यांची अॅण्टीजेन चाचणी सुरू केलीआहे. सौम्य लक्षणे असणाºयांनाही स्वॅब चाचणीसाठी आरोग्य केंद्रात नेले जात आहे. जे प्रवासी पॉझिटिव्ह आढळून येत आहेत, त्यांना विविध विलगीकरण कक्षांत दाखल केले जात आहे.
पोलीस आयुक्तांपाठोपाठ डोंबिवलीच्या तसेच विशेष शाखेच्या सहायक पोलीस आयुक्तांसह तीन अधिकारी आणि ११ कर्मचारी अशा १४ पोलिसांना बुधवारी कोरोनाची लागण झाली. सध्या २० कर्मचारी घरी, तर दोघांना केंद्रामध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांमधील कोरोनाचे प्रमाण हे अत्यल्प झाले होते.
आता यात पुन्हा वाढ झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यावर मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आता दोन सहायक पोलीस आयुक्त आणि उल्हासनगर नियंत्रण कक्षाचे एक सहायक पोलीस निरीक्षकही कोरोनामुळे बाधित झाले आहेत. त्याचबरोबर राबोडी, बिनतारी संदेश विभाग, खडकपाडा, बाजारपेठ आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी एका कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली. मुख्यालय आणि भिवंडी शहर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन कर्मचारी बाधित झाले आहेत. या सर्वांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत १३७ अधिकाºयांसह एक हजार २१८ पोलीस बाधित झाले असून एक हजार २१४ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.