१० नगरसेवकांवर टांगती तलवार? पक्षांतर करून निवडणूक लढले, कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 06:49 AM2017-11-27T06:49:14+5:302017-11-27T06:49:24+5:30
महापालिका निवडणुकीत नगरसेवकांनी तत्कालीन पक्षातील पदाचा राजीनामा न देता पक्षांतर करून निवडणूक लढवली. अशा नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी पालिका आयुक्तांकडे करून स्मरणपत्र दिले
उल्हासनगर : महापालिका निवडणुकीत नगरसेवकांनी तत्कालीन पक्षातील पदाचा राजीनामा न देता पक्षांतर करून निवडणूक लढवली. अशा नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी पालिका आयुक्तांकडे करून स्मरणपत्र दिले आहे. यामुळे पक्षांतर करणाºया नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत पक्षांतर करण्यापूर्वी आधीच्या नगरसेवकपदाचा राजीनामा महापालिका आयुक्तांकडे देणे आवश्यक होते. त्यांनी तसे न केल्याने महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अधिनियम, १९८६ मधील कलम ३ (१)(अ) नुसार नगरसेवकपदास पात्र ठरत नाही, अशी माहिती गंगोत्री व नगरसेविका सुनीता बागूल यांनी दिली.
महापालिका निवडणुकीत पक्षांतर करून लढवलेली निवडणूक नियमानुसार अपात्र ठरते. पालिका सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरतात. अशांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याकडे केली आहे. महासभेत या विषयावर चर्चा झाल्यावर निंबाळकर यांनी गंगोत्री यांच्याकडे कायदेशीर माहितीसाठी वेळ मागितला. मात्र अजूनही याबाबत आयुक्तांनी निर्णय न घेतल्याने, त्यांनी पुन्हा आयुक्तांना स्मरणपत्र दिले आहे.
हे आहेत ते उल्हासनगरचे नगरसेवक
महापालिका निवडणुकीत साईपक्षाच्या नगरसेविका जयश्री पाटील भाजपाच्या तिकिटावर तर रिपाइच्या नगरसेविका आशा बिºहाडे भाजपा तर पुष्पा बागूल शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्या.
काँगे्रसचे नगरसेवक राजेश वधारिया, मीना सोंडे, कांचन लुंड, दीप्ती दुधानी हे साई पक्षाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादीच्या लक्ष्मी सिंग, शुभांगी बहेनवाल, रेखा ठाकूर या भाजपाच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत.
पक्षांतर करून आलेल्या या १० नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी गंगोत्री यांनी केली आहे. दरम्यान, आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यातंर्गत उल्हासनगरचे पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे ते सध्या रजेवर गेले आहेत.
पालिका आयुक्त नेमके कधी हजर होणार हे निश्चित सांगता येत नसल्याने या संदर्भात कुठला निर्णय घेतात याकडे या नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.