भिवंडी येथील नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून १० कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 03:22 PM2020-01-17T15:22:03+5:302020-01-17T15:22:12+5:30
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
ठाणे – भिवंडी येथील महापालिकेच्या स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून १० कोटी रुपये देण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. देखभाल-दुरुस्तीअभावी हे नाट्यगृह गेल्या वर्षभरापासून बंद असल्याची बाब लक्षात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तातडीने नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) मनीषा म्हैसकर यांना नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी १० कोटींचा निधी देण्याचे निर्देश दिले.
भिवंडीतील नाट्यरसिकांसाठी २५ वर्षांपासून या नाट्यगृहाची उभारणी झाली. राज्यात युतीचे सरकार आणि भिवंडी महापालिकेत शिवसेनेचे नगराध्यक्ष असतानाच्या काळातच या नाट्यगृहाची उभारणी झाली असून गेली २५ वर्षे या नाट्यगृहाने भिवंडीतील रसिकांना मनोरंजनाचे एक हक्काचे ठिकाण उपलब्ध करून दिले होते. काळाच्या ओघात आता नाट्यगृहाच्या देखभाल-दुरुस्तीवर मोठा खर्च लागणार असून भिवंडी महापालिकेची आर्थिक स्थिती अडचणीची असल्यामुळे महापालिकेला हा खर्च करणे शक्य नसल्याची बाब लक्षात घेऊन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने राज्य सरकारकडून १० कोटींचा निधी मंजूर केला आहे.
भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण अष्टिकर यांच्याशी चर्चा करून श्री. शिंदे यांनी नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या कामांची माहिती घेतली आणि तातडीने १० कोटींचा निधी मंजूर करत असल्याचे त्यांना सांगितले. तसेच, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना भिवंडी महापालिकेला १० कोटींचा निधी देण्याचे निर्देश दिले आहेत.