जिल्ह्यातील १० धरणे ओव्हर फ्लो
By admin | Published: July 15, 2016 01:29 AM2016-07-15T01:29:16+5:302016-07-15T01:29:16+5:30
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांसह धरण क्षेत्रात आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे पाणीसमस्या दूर होण्याची दाट शक्यता आहे
ठाणे : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांसह धरण क्षेत्रात आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे पाणीसमस्या दूर होण्याची दाट शक्यता आहे. भातसा धरणात ५९.४६ टक्के तर बारवी धरणात ४५.७१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. याशिवाय, जिल्ह्यातील १७ पैकी १० छोटी धरणे भरल्यामुळे त्यांच्या सांडव्याद्वारे पाणी वाहत आहे.
गेल्या वर्षी तब्बल ३३ टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील एकही धरण भरले नव्हते. त्यामुळे नोव्हेंबरपासून पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. मेअखेरीस भातसातील पाणीसाठा १६ टक्के, तर बारवी धरणाचा साठा नऊ टक्के शिल्लक होता. पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमध्ये आतापर्यंत मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट पाऊस पडला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. भातसा व बारवीप्रमाणेच सर्वाधिक मोठे असलेल्या आंध्रा धरणामध्ये ५० टक्के पाणीसाठा तयार झाला, तर सूर्याच्या धामणीत ५५ टक्के, मोडकसागरमध्ये ५१.४२ टक्के आणि तानसात ५४.९ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे.