महापालिकेचा फतवा, १0 फुटांच्या मूर्तींना विसर्जन घाटात बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 04:32 AM2018-08-28T04:32:15+5:302018-08-28T04:33:13+5:30
सेनेचा विरोध : उल्हासनगर महापालिकेचा अजब फतवा
उल्हासनगर : शहरातील विसर्जन घाटात १0 फूट उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यास मनाई करणारा अजब फतवा महापालिकेने काढला आहे. महापालिकेच्या या आदेशापूर्वीच गणेश मंडळांनी उंच मूर्ती बनविल्या असून, महापालिकेच्या या भूमिकेवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतला आहे. आयुक्तांनी यावर उपाय शोधून कल्याण खाडीचा मार्ग मोकळा करण्याची मागणी सेनेने केली आहे.
महापालिका आयुक्त गणेश पाटील यांनी गणेश उत्सवानिमित्त वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदिप गोसावी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस, कल्याणजी घेटे, पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अजित गोवारी, नंदलाल समतानी, भगवान कुमावत, जनसंपर्क अधिकारी विनोद केणे आदींची बैठक घेऊन गणेशोत्सवाच्या रूपरेषेबाबत चर्चा केली. जास्त उंचीच्या मूर्तीमुळे दुर्घटना होऊ नये यासाठी कमी उंचीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन त्यावेळी सर्वस्तरातून करण्यात आले होते. गणेश उत्सव मंडळांनी नदी व खाडीतील पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी प्लास्टर आॅफ पॅरिसऐवजी शाडू मातीच्या गणपती मूर्ती घ्याव्यात, असे आवाहनही हिराली फाऊंडेशन आणि मेरा फाऊंडेशनने केले. तसेच विविध आकाराच्या मूर्तीही त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. उल्हासनगरातील आय.आय.डी.आय. कंपनीजवळ सर्व सुखसुविधायुक्त विसर्जन घाट बनविला असून १0 फुटापेक्षा कमी उंचीच्या मूर्तीचे विसर्जन येथे होणार आहे. सेंच्युरी रेयॉन, हिराघाट बोटक्लब, उल्हासनगर रेल्वेस्थानकाजवळील कृत्रिम तलाव, कैलास कॉलनी, गोलमैदान, शिवमंदिर घाट येथेही बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशन, कैलास कॉलनी व गोलमैदान येथे कृत्रिम विसर्जन तलाव बनविण्यात आला आहे.
शिवसेना विचारणार जाब
शहरातील विसर्जन घाटावर १0 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींना विसर्जन करण्याची बंदी घालण्याचा फतवा पालिकेने काढला. शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी यावर टीका केली आहे. आयुक्त गणेश पाटील यांनी यातून मार्ग काढून कल्याण खाडीचा मार्ग सुकर करण्याची मागणीही सेनेने केली. इतर पक्षांमधूनही महापालिकेच्या भूमिकेला विरोध होत आहे.
३ वर्षांपूर्वी एका उंच गणेशमूर्तीच्या मिरवणुकीत उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा धक्का बसून दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला होता.