मीरा-भाईंदरमधील १० गुटखा विक्रेत्यांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची गुटखा विक्रेत्यांवर कारवाई
By धीरज परब | Published: March 20, 2024 08:24 PM2024-03-20T20:24:23+5:302024-03-20T20:24:35+5:30
पानटपरीच्या मूळ मालकांवर पोलीस कारवाई करणार का, या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे .
मीरारोड - अन्न व औषध प्रशासनाने शासनाने बंदी घातलेला गुटखा व तंबाकू विकणाऱ्या पान टपरी चालकांवर मंगळवारी कारवाई करत १० पान टपरी चालकांना गुटखा साठ्यासह अटक केली आहे . या प्रकरणी भाईंदर , नवघर व मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर पानटपरीच्या मूळ मालकांवर पोलीस कारवाई करणार का, या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे .
मीरा भाईंदर मध्ये बंदी असलेला घातक असा गुटखा व सुगंधी तंबाकू आदींची उघडपणे विक्री होत असून पोलिसांचे हप्ते बांधलेले असल्याने गुटखा विक्रेते व तस्कर हे मोकाट असल्याचे आरोप होत असतात .
दरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी माणिक जाधव , प्रशांत पवार व भरत वसावे यांनी मंगळवार १९ मार्च रोजी मीरा भाईंदर मध्ये गुटखा विकणाऱ्या पान टपरी चालकांवर धाडी टाकल्या . या प्रकरणी मीरारोड , भाईंदर व नवघर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून १० आरोपीना अटक करण्यात आली आहे . त्यांच्या कडून प्रतिबंधित गुटखा - पानमसाला व सुगंधी तंबाकू आदींचा साठा जप्त करण्यात आला आहे .
भाईंदर पोलीस ठाणे हद्दीत भरत वसावे यांच्या फिर्यादी वरून गुटखा विक्रेते आरोपी सदाशिव देवी प्रसाद विश्वकर्मा (३४ ) रा . हार्मोनियम बिल्डिंग, गीता नगर, भाईंदर पश्चिम ; अजय महादेव बहादुर ( ४० ) रा . सिताराम अपार्टमेंट. फाटक मार्ग , गीता नगर व गजराज रामलखन चौरसिया ( ६० ) रा . श्री दुर्गा पराडकर भवन, गावदेवी मार्ग, भाईंदर गाव या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला . तिघांना भाईंदर पोलिसांनी १९ मारच्या रात्री अटक केली आहे .
मीरारोड पोलीस ठाण्यात माणिक जाधव यांच्या फिर्यादी वरून दाखल गुन्ह्यातील गुटखा विक्रेते सुनीलकुमार श्यामलाल चौरसिया ( वय ३२ ) रा . पेणकर पाडा, मीरारोड ; मोनू जोखू चौरसिया ( वय ३१ ) रा . अरुणोदय बिल्डिंग, चंदन पार्क, भाईंदर पूर्व व मोहम्मद समीम अली हुसेन अन्सारी (वय ४० ) रा . सिनेमॅक्स थिएटर जवळ झोपडपट्टी, मीरा रोड अशी अटक आरोपींची नावे आहेत
तर नवघर पोलीस ठाण्यात प्रशांत पवार यांनी दाखल गुन्ह्यानुसार जैन बंगल्या जवळील नंदिनी पान शॉप चालक सुरज रामस्वरत चौरसिया (२९ ) रा . रश्मी हेतल, सिनेमॅक्स जवळ ; मोती नगर येथील हार हर महादेव पानशॉप चालक कृपाशंकर राजाराम चौरसिया (२८ ) रा . दया सदन, हनुमान मंदिर जवळ ; कल्याणी बार जवळील सोनू पानशॉप चालक अनुराग जिमीपाल सिंग ( २१ ) रा . मनीष कॉम्प्लेक्स, फाटक मार्ग , भाईंदर पूर्व व न्यू गोल्डन नेस्ट येथील महालक्ष्मी पानशॉप चालक राजेंद्र रामबच्चन चौरसिया ( २७ ) रा . महालक्ष्मी पान शॉप , सोनम सागर, न्यू गोल्डन नेस्ट अशी अटक आरोपींची नावे आहेत .