मृतांच्या नातेवाइकांना 10 लाखांची मदत; मुंब्रा प्राईम क्रिटी केअर रुग्णालय दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 12:53 AM2021-04-29T00:53:50+5:302021-04-29T00:54:07+5:30
मुंब्रा प्राईम क्रिटी केअर रुग्णालय दुर्घटना; गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा
मुंब्रा : येथील प्राईम क्रिटी केअर या रुग्णालयामध्ये बुधवारी पहाटे आग लागून त्यात अतिदक्षता विभागातील सहापैकी चार रुग्णांचा मृत्यू झाला. या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस, ठाणे महापालिका अधिकारी आणि डॉक्टर यांची समिती नेमण्यात येणार असून, राज्य शासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख, तर जखमींच्या नातेवाइकांना एक लाखाचे अर्थसाहाय्य करण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.
राज्य शासनाप्रमाणेच ठाणे महापालिकेनेदेखील मृतांच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अशरफ ऊर्फ शानू पठाण यांनी केली होती. त्या मागणीला अनुसरून ठाणे महापालिकेनेदेखील नातेवाइकांना पाच लाखांची मदत करणार असल्याची घोषणा नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयांची पाहणी केल्यानंतर केली.
बुधवारी पहाटे रुग्णालयात आग लागल्याची माहिती मिळताच अवघ्या १० मिनिटांतच आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली. येथील मृतांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांनी त्यांचे सांत्वन केले. प्रचंड अंधार दाटलेला असतानाही त्यांनी रुग्णालयात प्रवेश करून मदतीचे कार्य स्वत: हाती घेतले.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी ती नेमकी कशामुळे लागली, याची चौकशी केली जाईल. प्रामुख्याने ही घटना का घडली, कशी घडली, याची संयुक्त चौकशी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि डॉक्टर करतील आणि ते घटनेमागच्या नेमक्या कारणांचा अभिप्राय देतील, अशी माहिती आव्हाड यांनी दिली.
फायर ऑडिटची नोटीस देऊनही दुर्लक्ष
या रुग्णालयाला यापूर्वीही ठाणे अग्निशमन विभागाच्यावतीने फायर ऑडिटची नोटीस बजावली होती; मात्र याकडे रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.