उल्हासनगरात नूतनीकरण करण्यात आलेल्या समाजमंदिराला गळती, १० लाख पाण्यात
By सदानंद नाईक | Published: November 17, 2023 07:09 PM2023-11-17T19:09:22+5:302023-11-17T19:09:37+5:30
कॅम्प नं-५, प्रेमनगर टेकडी महात्मा फुलेनगर येथे १० लाख खर्चून नूतनीकरण केलेल्या समाजमंदिराला गळती लागल्याचा प्रकार उघड झाला.
उल्हासनगर : कॅम्प नं-५, प्रेमनगर टेकडी महात्मा फुलेनगर येथे १० लाख खर्चून नूतनीकरण केलेल्या समाजमंदिराला गळती लागल्याचा प्रकार उघड झाला. पाणी गळतीच्या भीतीने विधुत उपकरणे काढून टाकण्यात आले असून समाज मंदिराचे ठेकेदाराद्वारे पुन्हा दुरुस्ती करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया उपअभियंता तरुण सेवकांनी यांनी दिली आहे.
उल्हासनगरात होत असलेल्या विकास कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. कोट्यावधीच्या निधीतून बांधण्यात आलेल्या रस्त्याला सहा महिन्यात भेगा पडून निकृष्ट होत असल्याचे प्रकार उघड होत आहे. तर दुसरीकडे ४१३ कोटीच्या भुयारी गटार योजनेवरही प्रश्नचिन्हे उभे ठाकले. कॅम्प नं-५ प्रेमनगर टेकडी येथील महात्मा फुलेनगर मध्ये सन-२०१२ साली समाजमंदिर बांधण्यात आले होते.
गेल्या वर्षी समाजमंदिराच्या नुतनीकरणासाठी १० लाखाचा निधी मंजूर करून नूतनीकरण करण्यात आले. तसेच जून महिन्यात समाजमंदिर नागरिकांसाठी खुले करण्यात आले. मात्र नूतनीकरण केलेल्या समाजमंदिराला गळती लागून सर्वत्र पाणीच पाणी झाले. विधुत शॉर्टसर्किटच्या भीतीने पंखा, लाईट व इतर उपकरणे काढून टाकण्यात आली. तसेच महापुरुषाच्या फोटोला पाणी लागल्याने, खराब होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. महात्मा फुलेनगर येथील समाजमंदिराच्या नूतनीकरणावर १० लाख रुपये खर्च करूनही पाणी गळती लागली कशी? असा प्रश्न स्थानिक नागरिक करीत आहेत. नूतनीकरणाच्या नावाखाली ठेकेदाराने थुकपट्टी केल्याचे बोलले जात आहे. अश्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. महापालिका अधिकारी, स्थानिक नेते व ठेकेदार यांच्या संगनमतातून विकास कामे निकृष्ट होत असल्याने, महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.
ठेकेदाराकडून होणार दुरुस्ती...
उपअभियंता सेवकांनी महात्मा फुलेनगर येथील महापालिका समाजमंदिराचे नूतनीकरण केल्यानंतरही पाणी गळती लागली आहे. ज्या ठेकेदाराने समाजमंदिराचे काम केले. त्याच्याकडून पुन्हा संजमंदिराची दुरुस्ती करून घेणार असल्याची प्रतिक्रिया उपअभियंता तरुण सेवकांनी यांनी दिली आहे.