ठाणे आणि भिवंडीत १० टक्के पाणी कपात
By अजित मांडके | Published: November 1, 2022 03:33 PM2022-11-01T15:33:54+5:302022-11-01T15:34:12+5:30
पिसे येथील न्युमॅटीक गेट सिस्टम मधील एअर ब्लॅडर बदलण्याच्या कामामुळे कपात
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मागील महिन्यात ठाणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणा:या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मंगळवार पासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पुढील १० दिवस मुंबई, ठाणे आणि भिवंडीला १० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.
मागील वर्षी प्रमाणे यंदा देखील धरण क्षेत्रत मुबलक पाऊस झाला आहे. त्यामुळे ठाणेकरांची तुर्तास पाण्याची चिंता मिटली आहे. असे वाटत होते. परंतु ठाणेकरांना पावसाळ्यात आधीच दोन वेळा पाणी कपातीचा सामना करावा लागला होता. पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रच्या मुखाजवळ कचरा साठल्याने ठाणोकरांना पाणी कपातीला मुकावे लागले होते. त्यानंतर दिवाळीच्या आधी देखील याठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. दोन ते तीन दिवस याचे काम करण्यात आले होते. परंतु पाऊस झाल्याने हे काम थांबविण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा पिसे येथील न्युमॅटीक गेट सिस्टम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मंगळवारी हाती घेण्यात आले आहे. या कामाचा परिणाम १० दिवस जाणवणार आहे. त्यामुळे दिवाळी संपताच ठाण्यासह, मुंबई आणि भिवंडीला देखील १० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.
कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करु न ठेवावा. तसेच काटकसरीने पाणी वापरु न सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान या पाणी कपातीचा सामना पूर्ण ठाणो शहराला बसणार असल्याची माहिती पालिकेने दिली. मुंबई महापालिकेकडून कोपरीला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे येथे फटका बसणार आहे. तसेच महापालिका पिसे धरणातून पाणी उचलत असल्याने त्याचा परिणाम घोडबंदर, वर्तकनगरसह संपूर्ण ठाणे शहराला बसणार आहे. एकूणच या कपातीचा कालावधीत पाणी पुरवठा कमी दाबाने होणार असून ठाणेकरांना पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.