१० रस्त्यांचा ताबा नाही तरीही पालिकेने काढली निविदा!
By अजित मांडके | Published: February 17, 2024 04:15 PM2024-02-17T16:15:37+5:302024-02-17T16:15:59+5:30
२८४ रस्त्यांची कामे पालिकेने घेतली हाती, ३४ रस्त्यांचे भवितव्याचे काय?
ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ठाणेकरांना खड्डेमुक्त रस्त्यांची हमी दिली आहे. त्यानुसार शहरातील २८४ रस्त्यांची कामे दोन टप्यात हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी ६०५ कोटींचा खर्च पालिकेच्या माध्यमातून केला जात आहे. परंतु महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार, या २८४ रस्त्यांपैकी ३४ रस्ते असे आहेत जे महापालिकेच्या अखत्यारीत नाहीत, तरीही या रस्त्यांच्या बांधकामाच्या संदर्भात निविदा काढण्यात आल्या आणि कंत्राटदार नेमण्यात आले. त्यातही यातील १० रस्त्यांवर कामच करता येणे शक्य नसल्याची माहिती महापालिकेतील सुत्रांनी दिली आहे. असे असतानाही त्या रस्त्यांवर पैसा का खर्च केला जातोय असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे उर्वरीत २४ रस्ते ताब्यात घेण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु असून ते केव्हा ताब्यात येणार याचेही उत्तर पालिकेकडे नाही.
मुख्यमंत्र्याचे बदलते ठाणे अंतर्गत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून रस्तांची डागडुजी नवीन रस्ते तयार करणे, सुशोभिकरणासह इतरही कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातही आता कुठे रस्त्यांची कामे प्रत्यक्षात दृष्टीपथात येत असून महापालिकेने हाती घेतलेल्या हे रस्ते डांबरी, सिमेंट कॉंक्रीट, मास्टीक अशा पध्दतीने केली जात आहेत. या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यातील काम डिसेंबरअखेर सुरू करण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्याचे काम फेब्रुवारी २०२३ मध्ये सुरू करण्यात आले. विशेषत: महापालिका प्रशासनाला पहिल्या टप्प्यातील १२७ रस्त्यांसाठी २१४ कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यातील १५७ रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून ३९१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातही या दोनही टप्यातील कामांसाठी वांरवार तारखा बदलण्यात आल्या. आता पुन्हा आणखी १५ दिवसांची मुदत पालिकेने घेतली आहे. आॅक्टोबर पासून हा तारीख पे तारीखचा खेळ सुरु आहे. पाच मुदतवाढ देऊनही सरासरी ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यात पहिल्या टप्यातील रस्त्यांची कामे ९० टक्के आणि दुसऱ्या टप्यातील कामे ८० टक्के पूर्ण झाली आहेत.
त्यातही आता एकूण २८४ रस्त्यांपैकी आतापर्यंत २५० रस्त्यांची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर पोहोचली आहेत. उर्वरित ३४ रस्त्यांपैकी २४ रस्त्यांच्या बांधकामात जागेअभावी अडचणी येत आहेत. ज्यामध्ये कळवा-०४, मुंब्रा-०२, दिवा-०४, घोडबंदर-०३, वर्तक नगर-०२, वागळे-०२ आणि इतर ठिकाणे या तीन रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांचा ताबा घेण्यासाठी महापालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. उर्वरित १० रस्ते असे आहेत की ते अद्यापही महापालिका प्रशासनाला आपल्या ताब्यात घेता आलेले नाहीत. तर ते ताब्यातही घेता येणे शक्य नसल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली. तर या रस्त्यांसाठी जागाच उपलब्ध नसल्याचेही पालिका सुत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे मग अशा रस्त्यांसाठी निविदा का काढली, ठेकेदारांना कामे का दिली असे सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत.