ई- वाचनालयााठी १० रूपये शुल्क
By admin | Published: May 23, 2017 01:34 AM2017-05-23T01:34:06+5:302017-05-23T01:34:06+5:30
महापालिकेच्या अभ्यासिका व ई-वाचनालयासाठी आता महिना केवळ १० रुपये शुल्क आकारण्याचा ठराव महासभेने केला आहे. शिवाय रात्रभर अभ्यासिका खुल्या राहणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : महापालिकेच्या अभ्यासिका व ई-वाचनालयासाठी आता महिना केवळ १० रुपये शुल्क आकारण्याचा ठराव महासभेने केला आहे. शिवाय रात्रभर अभ्यासिका खुल्या राहणार आहेत.
मीरा भार्इंदर महापालिकेकडून शहरात नऊ अभ्यासिका व चार इ- वाचनालय चालवले जाते. शहरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सोय व्हावी तसेच शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त माहिती मिळावी म्हणून वाचनालय सुरू करण्यात आले आहे.
पालिकेकडून अभ्यासिकेसाठी ५०० रूपये वार्षिक शुल्क, लॉकर हवा असेल तर आणखी ५०० रूपये वार्षिक शुल्क आकारले जाते. तर इ- वाचनालयासाठी एक हजार अनामत रक्कम व महिना २०० रूपये शुल्क आकारले जाते.
ई- वाचनालयाचा वापर रोज एक तास करता येतो. परंतु पालिकेची अभ्यासिका व वाचनालयासाठी असलेले मासिक शुल्क व अनामत रक्कम जास्त असल्याने ती कमी करण्याची मागणी नगरसेवक डॉ. राजेंद्र जैन यांनी केली होती. त्या अनुषंगाने महासभेत अभ्यासिका व इ वाचनालयाचे दर कमी करण्याचा प्रस्ताव आणला होता. डॉ. जैन यांनी मांडलेल्या ठरावानुसार आता अभ्यासिका वा इ- वाचनालयाचे शुल्क प्रती महिना केवळ १० रूपये केले आहे.
तर ई- वाचनालयासाठी आता ५०० रुपये अनामत रक्कम केली आहे. लॉकर घेतल्यास मासिक शुल्क १५ रुपये आकारले जाणार आहे. शिवाय अभ्यासिका व ई- वाचनालय रात्रभर मुलांना अभ्यासासाठी खुली ठेवली जाणार असून सुरक्षाही ठेवली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. गरीब घरातील मुलांना या अभ्यासिकेचा अधिक फायदा होईल असे सांगण्यात आले.