उल्हासनगरवासीयांच्या सेवेत १०० खाटांचे नवे सुसज्ज रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 08:30 PM2018-07-19T20:30:40+5:302018-07-19T20:30:51+5:30
उल्हासनगर येथील धोकादायक झालेल्या कामगार रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या वर्षीपासून सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आले असून सध्याच्या इमारती पाडून त्या ठिकाणी १०० खाटांचे नवे रुग्णालय उभारणीचे काम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला सुपूर्द करण्यात आले आहे.
ठाणे : उल्हासनगर येथील धोकादायक झालेल्या कामगार रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या वर्षीपासून सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आले असून सध्याच्या इमारती पाडून त्या ठिकाणी १०० खाटांचे नवे रुग्णालय उभारणीचे काम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला सुपूर्द करण्यात आले आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार असून त्याबाबतचे पत्र कामगार राज्य विमा योजना महामंडळाच्या दिल्लीतील मुख्यालयातून खा. डॉ. शिंदे यांना प्राप्त झाले आहे. उल्हासनगरवासीयांना सुसज्ज अत्याधुनिक रुग्णालय मिळवून देण्याचा शब्द खा. डॉ. शिंदे यांनी अलिकडेच जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत दिला होता.
आयआयटीने केलेल्या सर्वेक्षणात उल्हासनगर येथील कामगार रुग्णालयाच्या सर्वच्या सर्व १३ इमारती धोकादायक झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे या रुग्णालयाचा पुनर्विकास व्हावा आणि नवे सुसज्ज रुग्णालय तयार करण्यात यावे, यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी पाठपुरावा सुरू केला होता. गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात त्यांनी या रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित केला, तसेच केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय आणि कामगार राज्य विमा योजनेचे मुख्य अभियंते सुदीप दत्ता यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तातडीने रुग्णालयाच्या पुनर्विकासाची मागणी केली होती.
त्यानंतर राज्याचे आऱोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचीही मुंबई येथे मंत्रालयात वारंवार भेट घेऊन या रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी पाठपुरावा केला होता. खा. डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे डॉ. दीपक सावंत यांनी गेल्या वर्षी ६ सप्टेंबर रोजी कामगार रुग्णालयाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहाणी केली होती. या रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव लवकरच केंद्राकडे पाठवण्याची ग्वाही डॉ. सावंत यांनी या भेटीनंतर दिली होती.