पावसाळ्या पूर्वी ओवळा माजिवडा मतदारसंघातले १०० बस थांबे व विश्रांती कट्टे होणार सुशोभित; १० कोटींचा खर्च
By धीरज परब | Published: May 10, 2023 05:19 PM2023-05-10T17:19:36+5:302023-05-10T17:19:51+5:30
मीरा भाईंदर व ठाणे शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासह नागरिकांना देखील आवडतील असेल हे बस थांबे व विश्रांती कट्टे बनवले जाणार आहेत.
मीरारोड - मीरा भाईंदर व ठाण्याच्या काही भागात आलेल्या ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात १०० बस स्टॉप व ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांती कट्टे आकर्षक स्वरूपात उभारण्याचे काम पावसाळ्या पूर्वी पूर्ण केले जाणार असून त्यासाठी १० कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.
मीरा भाईंदर व ठाणे शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासह नागरिकांना देखील आवडतील असेल हे बस थांबे व विश्रांती कट्टे बनवले जाणार आहेत. लोकांचे लक्ष वेधून घेतील असे रंगबेरंगी तसेच बस, रिक्षा, मेट्रो, रेडिओ, रेल्वे, संत्र - सफरचंद अशा फळांच्या आकर्षक प्रतिकृतीमध्ये हे बस स्टॉप व विश्रांती कट्टे तयार करण्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आले आहेत. शहरात पहिल्यांदाच अश्या आकारां मध्ये हे बस स्टॉप, विश्रांती कट्टे होणार असल्याने परिसराची देखील शोभा वाढणार आहे. त्यासाठी जागांची निश्चिती महापालिकेने केली असून पुढील आठवड्यात कामाची सुरुवात होऊन पावसाच्या आधी जून महिन्यात काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल असे आ. सरनाईक यांनी सांगितले.
बस पकडण्यासाठी ऊन - पावसात उभे राहणारे नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिकांना विश्रांती घेण्यासाठी विश्रांती कट्टे चांगले आकर्षक असावेत. नागरिकांना प्रसन्न वाटावे यासाठी बस स्टॉप व विश्रांती कट्टे तयार करण्याची संकल्पना मांडली होती. मान्यवर डिजाईनरकडून ह्या अनोख्या बस स्टॉप व विश्रांती कट्ट्यांचे डिजाईन बनवून घेतले. बस स्टॉपवर जाहिरात करण्याचा अधिकार देऊन त्यांच्याकडून त्याची देखभाल - दुरुस्तीची जबाबदारी १० वर्षासाठी ठेकेदाराला देण्यात येईल. त्या बदल्यात बस स्टॉप व विश्रांती कट्ट्यावर ३ फूट जागेत जाहिरात करण्याचा अधिकार त्या संस्थेला देण्यात येणार असल्याचे या. सरनाईक म्हणाले.