सिव्हिलमध्ये एकाच दिवशी 100 बालकांवर शस्त्रक्रिया; हर्निया, फायमोसिस, मान, पोटाची गाठ यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 06:31 AM2024-12-02T06:31:03+5:302024-12-02T06:31:46+5:30
सध्या रुग्णालयात दर दिवशी ७०० रुग्ण उपचारासाठी येतात. काहीवेळा या रुग्णांवर लहान, मोठ्या शस्त्रक्रियाही केल्या जातात.
ठाणे : महागड्या रुग्णालयात लाखाे रुपये खर्च करून लहान शस्त्रक्रिया करायची ऐपत सर्वांची नसते पण त्यावर मात करण्यासाठी लहान मुलांवर जोखमीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास गरजू सध्या ठाणे सिव्हिल रुग्णालयात येतात.
यानुसार रविवारीही राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शून्य ते १८ वयोगटांतील १०० मुला-मुलींच्या डोळ्यांची, रक्ताची गाठ, चिकटलेली बोट, हर्निया, फायमोसिस, मान, पोटाची गाठ आदीं शस्त्रक्रिया एकाच दिवशी करण्याचा विक्रम जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कैलास पवार यांच्या नेतृत्वाखाली रविवारी डाॅक्टरांनी केला. सध्या रुग्णालयात दर दिवशी ७०० रुग्ण उपचारासाठी येतात. काहीवेळा या रुग्णांवर लहान, मोठ्या शस्त्रक्रियाही केल्या जातात.
ठाणे, पालघर जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश
ठाणे शहरात अत्यंत महत्त्वाचे म्हणून ओळख असलेले सिव्हील रुग्णालय दीड वर्षांपासून येथील वागळे इस्टेट येथे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत केले आहे. मात्र, रुग्णांची आबाळ होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाकडून घेतली जात आहे. रुग्णालयात दर दिवशी सुमारे ६०० ते ७०० रुग्ण उपचारासाठी येतात. काहीवेळा या रुग्णांवर लहान, मोठ्या शस्त्रक्रियाही केल्या जातात. मात्र, रविवारी लहान मुलांवर विविध शस्त्रक्रिया करण्याचा अनोखा कार्यक्रम पार पडला. ठाणे, पालघर जिल्ह्यातून आलेल्या मुलांची शारीरिक तपासणी करून सोप्या आणि अवघड अशा दोन्ही प्रकारच्या १०० शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या, अशी माहिती डॉ. पवार यांनी दिली.
सायन रुग्णालयाचे सहकार्य बालकांच्या या नाजूक शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन दिवस
अगोदरच मुलांना घेऊन पालक रुग्णालयात येतात. त्यामुळे त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय रुग्णालयाने केली. केईएम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ. संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली मुला, मुलींच्या हर्निया, चरबीची गाठ, डोळ्यांचा तिरळेपणा, फाटलेले ओठ, हायड्रोसील, फायमोसिस, चिकटलेली बोट, रक्ताची गाठ, मूळव्याध अशा विविध शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यासाठी सायन रुग्णालयाचे मोठे सहकार्य लाभले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत के.ई.एम. हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ. संजय ओक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी सिव्हील रुग्णालयात लहान मुलामुलींच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दुर्बिणीद्वारे बहुतांश शस्त्रक्रिया केल्या. सिव्हील रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात आधुनिक उपकरणे आहेत.
- डॉ. कैलास पवार,
जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
ठाणे सिव्हील रुग्णालयात चांगल्या शस्त्रक्रिया होतात हे केवळ ऐकून होतो. मात्र, आज प्रत्यक्ष अनुभवले आहे. सरकारी रुग्णालयात अशा शस्त्रक्रिया पार पडत असतील तर सर्वांनी सिव्हीलमध्ये येऊन उपचार घ्यावेत.
- प्रमिला जाधव,
रुग्णाचे नातेवाईक, कल्याण