१०० कोटी खर्च, रुग्णांची परवड थांबेना; जिल्हा रुग्णालय बंद झाल्याने ताण वाढल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 08:52 AM2023-08-14T08:52:33+5:302023-08-14T08:53:24+5:30
कळवा रुग्णालयावर वार्षिक १०० कोटींपेक्षा अधिकचा खर्च केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. वार्षिक १०० कोटींचा खर्च करूनही रुग्णालयात आजही अनेक सुविधा नसल्याचेच दिसून आले आहे. आता ही घटना घडल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने जिल्हा शासकीय रुग्णालय बंद झाल्याने कळवा रुग्णालयावरील ताण वाढल्याचा दावा केला आहे. मात्र दोन महिन्यांपासून जिल्हा रुग्णालय बंद होते, तर त्यानुसार त्याचा ताण कळवा रुग्णालयावर येईल, याची कल्पना रुग्णालय प्रशासनाला नव्हती का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
कळवा रुग्णालयावर वार्षिक १०० कोटींपेक्षा अधिकचा खर्च केला जात आहे. परंतु अद्यापही येथे येणाऱ्या रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार येथे मिळत नसल्याचे दिसत आहे. दरवर्षी पावसाळ्यात साथरोग आल्यानंतर रुग्णालयाचा ताण वाढत असतो, परंतु यंदा अचानक ताण वाढल्याची माहिती रुग्णालय प्रशासन देत आहे. अतिरिक्त रुग्णांसाठी तात्पुरत्या स्वरुपात रिकाम्या जागेत खाटा लावल्या जात आहेत. परंतु जागाही कमी पडत असल्याचा दावा रुग्णालयाचे अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी केला आहे. त्यानुसार आम्हाला वाढीव जागा हवी असल्याचेही त्यांनी सांगितले. रुग्णालयात सद्य:स्थितीत १२५ शिकाऊ डॉक्टर आणि १५० च्या आसपास तज्ज्ञ डॉक्टर असल्याचे सांगितले जात आहे.
भविष्यात वाढणार आणखी ५०० बेड
पुढील १० महिन्यांत रुग्णालयाचा कायापालट केला जाईल, असे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. ६० कोटींच्या धीतून अतिरिक्त ५०० बेडसह सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
प्रशासन खोटे बोलते की काय?
एकाच दिवशी एवढ्या रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने जिल्हा रुग्णालय बंद असल्याचे कारण पुढे केले. मात्र जिल्हा रुग्णालयात १८६ बेड रिक्त असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितल्याने प्रशासन खोटे बोलते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- रुग्णालयाच्या ओपीडीवर - रोज २२०० हून अधिक रुग्णांचा ताण
- बेडची क्षमता : ५००, दाखल रुग्ण ५६६
- आयसीयूमधील हेड : ४०, सर्व फुल्ल
-प्रसूतीमध्ये : १५ टक्क्यांची वाढ
रुग्णालयातील स्टाफ असा
- कर्मचाऱ्यांची संख्या : ८००
- परिचारिका : १८०
- वैद्यकीय प्राध्यापक : १२५
- निवासी डॉक्टर : १५०
‘अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करू’
भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी योग्य ती उपाययोजना करणार असल्याची माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी बोलत होत्या.
आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून ठाणे जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्याही मोठा जिल्हा आहे. एका बाजूला सिव्हिल हॉस्पिटलचे काम सुरू असताना आरोग्य व्यवस्थेचे विस्तारीकरण गरजेचे आहे, असे तटकरे म्हणाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार नेमल्या जाणाऱ्या समितीला विभागानुसार आरोग्य सुविधा वाढवण्याची गरज आहे का? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यावर अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही त्या म्हणाल्या.