ठाण्यात १०० तज्ज्ञांकडून क्लस्टरचा अभ्यास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 06:43 AM2018-02-02T06:43:28+5:302018-02-02T06:43:37+5:30
ठाणेकरांना क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करून धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहणाºयांना ३०० चौरस फुटांपर्यंत हक्काची आणि सुरक्षित घरे विनामूल्य देण्याकरिता नेमलेल्या सल्लागारांनी ठाणे महापालिका अभियंत्यांच्या १० टीम तयार केल्या असून त्यांच्या माध्यमातून शहरातील शाळा, मैदाने, रस्ते, झोपडपट्टी आदींसह इतर माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे.
ठाणे : ठाणेकरांना क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करून धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहणाºयांना ३०० चौरस फुटांपर्यंत हक्काची आणि सुरक्षित घरे विनामूल्य देण्याकरिता नेमलेल्या सल्लागारांनी ठाणे महापालिका अभियंत्यांच्या १० टीम तयार केल्या असून त्यांच्या माध्यमातून शहरातील शाळा, मैदाने, रस्ते, झोपडपट्टी आदींसह इतर माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे.
ठाणे स्टेशन आणि वागळे पट्टा या भागाचा पहिल्या टप्प्यात सामूहिक विकास केला जाणार आहे. याकरिता, सल्लागारांच्या नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या योजनेसाठी किमान आठ हजार चौरस मीटर भूखंडाची आवश्यकता असून क्लस्टरमध्ये झोपडपट्टी आणि अधिकृत इमारती असल्यास त्यांची कमाल मर्यादा अनुक्रमे २५ टक्के आणि ४० टक्के असणार आहे. क्लस्टर योजनेत ४ एफएसआयला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, पालिकेने याआधीच क्लस्टरचा अभ्यास सुरू केला आहे. या वाढीव एफएसआयमुळे झोपडपट्टी विकासाला अधिक फायदा होणार आहे.
या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पालिका अर्बन रिन्युव्हल प्लान तयार करणार असून योजना कोणत्या भागात कशा पद्धतीने राबवता येऊ शकते, याचा अभ्यास करणार आहे. परंतु, हा अभ्यास करत असतानाच उर्वरित ठिकाणी क्लस्टरची योजना राबवण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. ठाणे महापालिकेचे ८० अभियंते आणि सल्लागारांचे ३० जण असे मिळून तब्बल शंभरहून अधिक तज्ज्ञांची फळी सध्या प्रत्येक प्रभाग समितीत फिरत असून त्या ठिकाणी रस्ते कसे आहेत, मैदाने किती आहेत, गार्डन, शौचालये आदींसह इतर नागरी आरक्षणांची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. या सुविधांच्या अभ्यासानंतरच क्लस्टरच्या परिणामांचा तपशील हाती येईल.
हरकती, सूचनांनंतरच प्रक्रिया मार्गी लागणार
दुसºया टप्प्यात प्रत्येक भागाच्या सीमा निश्चित केल्या जाणार आहेत. त्यानंतर, विकास आराखड्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
प्रत्येक विभागाचा आराखडा तयार केला जाणार असून यावर नागरिकांच्या हरकती व सूचना घेतल्या जाणार आहेत. त्यानंतरच खºया अर्थाने क्लस्टरचा विकास होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.