मेंटल हॉस्पिटलच्या आवारामध्ये लवकरच १०० खाटांचे स्त्री रूग्णालय !
By admin | Published: July 6, 2017 06:16 AM2017-07-06T06:16:57+5:302017-07-06T06:16:57+5:30
राज्य शासनाने ठाणे जिल्ह्याकरीता ‘स्त्री रूग्णालय’ उभारण्यास मान्यता दिली आहे. येथील मेंटल हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये या रूग्णालयासाठी
सुरेश लोखंडे/लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्य शासनाने ठाणे जिल्ह्याकरीता ‘स्त्री रूग्णालय’ उभारण्यास मान्यता दिली आहे. येथील मेंटल हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये या रूग्णालयासाठी जागा निश्चित केली आहे. अत्याधुनिक सुविधांच्या या रुग्णालयात सुमारे १०० खाटांची व्यवस्था राहणार आहे.
करोडो रूपये खर्च करून या स्त्री रुग्णालयाची इमारत उभी राहणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये एक विशेष अत्याधुनिक ‘स्त्री रूग्णालय’ बांधण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यात ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. रुग्णालय उभारणीसाठी शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाव्दारे निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याच्या वृत्तास येथील सिव्हील रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पी पाटील यांनी दुजोरा दिला. मेंटल हॉस्पिटलच्या मालकीच्या दोन एकर जागेत हे स्त्री रूग्णालय उभे राहणार आहे.
मध्य रेल्वे, एक्स्प्रेस हायवे आणि एलबीएस हायवेला लागून असलेल्या मेंटल हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये या रूग्णालयासाठी जागा निश्चितही केली आहे. सध्या मेंटल हॉस्पिटलच्या अखत्यारीत सद्यस्थित ७२ एकर जागा आहे.
जागा अतिक्रमित
स्त्री रूग्णालयासाठी निश्चित केलेल्या मेंटल हॉस्पिटलच्या सुमारे ११ एकर जागेवर झोपडपट््यांचे अतिक्रमण असून महापालिकेची शाळा, गार्डन व नाना नानी पार्क आहे.
या शिवाय ज्ञान साधना महाविद्यालय, सैनिकी वसतीगृह आणि रूग्णालय अधिकारी, कर्मचारी कॉलनी सध्या अस्तित्वात आहे. रेल्व स्टेशनसाठीदेखील सुमारे १० एकर जागे दिली जाणार आहे. त्यात आता अत्याधुनिक दर्जाचे ‘स्त्री रूग्णालय’ बांधण्यासाठी आरोग्य खात्याने कंबर कसली आहे.