३२१ किलो कचऱ्यापासून १०० किलो जैविक खत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:44 AM2021-09-27T04:44:08+5:302021-09-27T04:44:08+5:30
ठाणे : ठाणे शहरात कचऱ्याची समस्या भेडसावत असताना कचराकुंडीत किंवा कचराभूमीवर घरातील कचरा जाण्यापासून पर्यावरणप्रेमी प्रतीक वालावलकर या तरुणाने ...
ठाणे : ठाणे शहरात कचऱ्याची समस्या भेडसावत असताना कचराकुंडीत किंवा कचराभूमीवर घरातील कचरा जाण्यापासून पर्यावरणप्रेमी प्रतीक वालावलकर या तरुणाने रोखला आहे. प्रतीकच्या घरातील कोणताही विघटनशील कचरा हा घराबाहेर जात नाही. घरातच तो विघटनशील कचऱ्यापासून जैवखत बनवून सुका (अविघटनशील) कचरा पुनःप्रक्रियेसाठी देत आहे. आतापर्यंत त्याने विघटनशील कचऱ्याचे १०० किलो दर्जेदार जैव खतात रूपांतर केले. जवळपास ३२१ किलो सेंद्रिय कचऱ्याच्या विघटनातून ३१ टक्के जैव खताचे उत्पन्न मिळाल्याचे प्रतीकने सांगितले.
परिसरात दुर्गंधी आणि रोगराई पसरविण्यास कारणीभूत ठरणारा सेंद्रिय कचरा घराबाहेर न जाता त्याचे घरच्याघरीच दुर्गंधीविरहित शास्त्रोक्त पद्धतीने विघटन होऊन जैव खतात रूपांतर व्हावे, या विचारातून प्रतीकने घरातच सेंद्रिय कचऱ्यापासून जैव खतनिर्मिती या प्रकल्पांतर्गत सेंद्रिय कचरा खाणारी बादली वापरायला २० सप्टेंबर २०१७ रोजी सुरुवात केली. २० सप्टेंबर २०१७ ते २८ मार्च २०२१ या १२८५ दिवसांत (३ वर्षे आणि १८९ दिवस) या प्रकल्पामुळे घरातील जवळपास ३२१ किलोग्रॅम सेंद्रिय कचरा प्रतीक आणि त्याच्या कुटुंबाने कचराकुंडीत आणि ओघाने शहरातील कचराभूमीवर जाण्यापासून रोखला. त्या कचऱ्याचे झाडांच्या वाढीकरिता आणि मातीची सुपीकता, तिचा पोत वाढविण्याकरिता आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांनी युक्त अशा दर्जेदार जैव खतात रूपांतर केले. या प्रक्रियेत प्रतीक आणि त्याचे कुटुंबीय घरात दररोज उत्पन्न होणारा सेंद्रिय कचरा शक्य तेवढा बारीक चिरून तो जैव खतनिर्मितीच्या बादलीत नीट पसरवून टाकतात आणि बादलीतील जैवविघटन प्रक्रिया कार्यान्वित झालेल्या थराशी तो एकरूप होईल अशा पद्धतीने तो ढवळतात; ज्याकरिता पंधरा ते वीस मिनिटे लागतात.
सुक्या कचऱ्याचे पुनर्रचक्रीकरण
उत्कृष्ट प्रतीचे जैव खत नजरेने, गंधाने आणि स्पर्शाने ओळखण्याच्या काही खुणा आहेत आणि या सगळ्या खुणा आमच्या जैव खताशी अगदी तंतोतंत जुळतात असे निरीक्षण प्रतीकने नोंदविले. त्याच्या घरातील ई-वेस्टसह कागद, प्लास्टिक, काच, धातू, लाकूड, कापड, रबर, चामडे असा सर्व प्रकारचा सुका कचरा पुनर्चक्रीकरणाकरिता दिला जातो, असे तो अभिमानाने सांगतो.