ई-लर्निंगमध्ये १०० नवी अॅप
By admin | Published: December 8, 2015 12:45 AM2015-12-08T00:45:32+5:302015-12-08T00:45:32+5:30
ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या ई-लर्निंग पद्धतीमध्ये १०० वेगवेगळ्या अॅप्लिकेशन्सचा वापर करण्यात येणार असून या पद्धतीमुळे पालिका
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या ई-लर्निंग पद्धतीमध्ये १०० वेगवेगळ्या अॅप्लिकेशन्सचा वापर करण्यात येणार असून या पद्धतीमुळे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना माहितीचे दालन खुले होणार असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.
विद्यार्थ्यांची अभ्यासक्षमता, आकलनशक्ती, प्रश्न सोडविण्याचे कौशल्य यामध्ये विकास होण्याकरिता ही पद्धत अत्यंत उपयोगी ठरेल, असा दावाही त्यांनी केला आहे.
स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
पालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक दर्जा सुधारावा, यासाठी या शाळांमध्ये ई-लर्निंगचे वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. व्होकार्ड फाउंडेशन ही ना नफा आधारित सामाजिक सेवा देणारी तसेच समाजकल्याण कार्यात राष्ट्रीयस्तरावर काम करणारी संघटना असून ती विद्यार्थ्यांना ई-लर्निंगमार्फत शिक्षण देत आहे.
विद्यार्थ्यांचा उच्च व गुणात्मक शैक्षणिक दर्जा सुधारावा म्हणून नवनवीन शोधप्रक्रियेद्वारे शिक्षणाचे काम करत आहे. यामध्ये ई-लर्निंग पद्धत राबवताना विविध प्रकारच्या १०० अॅप्लिकेशन्सचा वापर केला जाणार असून विद्यार्थ्यांची अभ्यासक्षमता, आकलनशक्ती, प्रश्न सोडविण्याचे कौशल्य यामध्ये विकास होण्याकरिता तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शैक्षणिक दर्जा आदी वाढविण्यासाठी मदत होणार आहे.
ही पद्धत महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमाच्या नर्सरी ते दहावीपर्यंतच्या शाळांच्या अभ्यासक्र मावर आधारित असून यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम दृकश्राव्य पद्धतीने शिकवून आनंददायी वातावरणात प्रश्न सोडविणे शक्य होणार आहे.
ही पद्धत शास्त्रोक्त असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करून विद्यार्थी परीक्षेची भीती न बाळगता सहजपणे खेळीमेळीच्या वातावरणात परीक्षा देऊ शकतील.
यामध्ये एकूण २४ संच पुरविण्यात येणार असून त्यापैकी १२ संच व्होकार्ट फाउंडेशन मोफत देणार आहे.