मुंब्य्रात वीकेंड लॉकडाऊनला १०० टक्के प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:39 AM2021-04-11T04:39:07+5:302021-04-11T04:39:07+5:30
मुंब्राः वीकेंड लॉकडाऊनला पहिल्या दिवशी मुंब्य्रात १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील रेल्वेस्थानक परिसर तसेच स्थानकाजवळील प्रमुख बाजारपेठ, ...
मुंब्राः वीकेंड लॉकडाऊनला पहिल्या दिवशी मुंब्य्रात १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील रेल्वेस्थानक परिसर तसेच स्थानकाजवळील प्रमुख बाजारपेठ, आनंद कोळीवाडा, नारायणनगर, संजयनगर, ठाकुरपाडा, रेतीबंदर, अमृतनगर, गुलाब पार्क बाजारपेठ, कौसा, रशीद कंपाउंड, चर्णी पाडा आदी भागातील सर्वच प्रकारच्या व्यापारी तसेच भाजी आणि फळविक्रेत्यांनी वींकेड लॉकडाऊननिमित्त त्यांची व्यवसाय बंद ठेवले होते. येथील नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडण्याचे टाळल्याने रस्त्यावर अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडलेल्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच व्यक्तींचा संचार सुरू होता. येथील नागरी वसाहतीमधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर तुरळक वाहने धावत होती. प्रवासी संख्या कमी असल्यामुळे बहुतांशी रिक्षाचालकांनी त्यांच्या रिक्षा बंद ठेवल्या होत्या. यामुळे रेल्वेस्थानकाजवळील रिक्षाथांब्यावर तुरळक रिक्षा दिसत होत्या. बाजारपेठा बंद असल्यामुळे शुकशुकाट असलेल्या रस्त्यावर संध्याकाळच्या वेळी तरुण क्रिकेट खेळत होते. यामुळे संचारबंदीचा निर्देशाचा भंग झाल्याचे दृष्य काही ठिकाणी दिसत होते.