फी न भरल्याने पहिल्याच दिवशी १०० विद्यार्थी वर्गाबाहेर, ठाणे पोलिस स्कूलमधील प्रकार; पालकांनी व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 08:47 AM2024-06-11T08:47:28+5:302024-06-11T08:49:24+5:30
Thane School News : शाळेच्या पहिल्याच दिवशी चालू वर्षातील फी न भरल्यामुळे खारकर आळी येथील ठाणे पोलिस स्कूलमध्ये शिकणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्यात आले. यात पोलिसांबरोबर इतर सर्वसामान्य नागरिकांची मुले आहेत.
ठाणे - शाळेच्या पहिल्याच दिवशी चालू वर्षातील फी न भरल्यामुळे खारकर आळी येथील ठाणे पोलिस स्कूलमध्ये शिकणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्यात आले. यात पोलिसांबरोबर इतर सर्वसामान्य नागरिकांची मुले आहेत. दर महिन्याच्या १२ तारखेच्या आत फी भरायची असून, अंतिम मुदतीच्या आत शाळा व्यवस्थापकांकडून फी मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्यास मुख्याध्यापकांनी टाळाटाळ केली.
ठाणे पोलिस शाळेचे एक ॲप आहे आणि त्या ॲपवर १२ जूनपर्यंत फी भरू शकता, असे नमूद असताना सोमवार शाळेचा पहिला दिवस आणि आजच फी आणायला हवी होती, असा धोशा व्यवस्थापनाने लावला. शाळा प्रशासनाने तब्बल १०० विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेरील ग्राउंडवर बसवून ठेवले. नौपाडा पोलिस ठाण्यात पोलिस नाईक म्हणून कर्तव्यावर असलेल्या लक्ष्मी क्षीरसागर म्हणाल्या की, मुलाला सकाळी ७ वाजता शाळेत पाठवले. त्याला वर्गाबाहेर बसवून ठेवले, फी आम्ही वेळेतच भरतो. मी आता शाळेमध्ये फीचा धनादेश घेऊन आली होती. परंतु तेथील मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी दाद दिली नाही. पोलिस म्हणून ड्यूटी करायची की मनमानीकडे पाहायचे. पोलिसांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार नाही का?, असा प्रश्न क्षीरसागर यांनी केला.
मुलांच्या मनावर परिणाम
पगार महिन्याच्या १० तारखेला होतो. त्यामुळे संध्याकाळी फी भरायचे, असे ठरवले होते. असे असताना मुलाला वर्गाबाहेर काढले. शाळेच्या ॲपवर फी भरण्याची अंतिम तारीख दर महिन्याची १२ तारीख आहे. अर्धी मुले शिकत आहेत आणि अर्ध्यांना वर्गाबाहेर बसवले आहे. त्यामुळे मुलांच्या मनावर काय परिणाम होणार, याचा विचार शाळेने केला नाही, असे पालक पूनम कडव म्हणाल्या. वैभवी बांदेकर म्हणाल्या की, फी भरली असतानाही मुलाला बाहेर बसवले. मुलांना आमच्या ताब्यात दिले नाही.
मनमानी कारभार
एका पालकाने व्हिडीओ काढला म्हणून मुलांना ग्राऊंडमधून शाळेत नेऊन एका खोलीमध्ये बसवले. परंतु त्यांना वर्गात शिकण्यासाठी बसू दिले नाही. असा मनमानी कारभार पोलिस स्कूल प्रशासनाचा सुरू असल्याचा आरोप पालकांनी केला.
मुख्याध्यापिकेविरोधात कारवाईची मागणी
ही घटना समजताच युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी शाळेत धाव घेतली. मुख्याध्यापकांनी त्यांच्याशीही सुरुवातीला उर्मटपणे वर्तन केल्याचे त्यांनी सांगितले. उद्धट वागणूक पाहता त्यांना शिवसेना स्टाइल दाखवली. शाळेत शिकणार नाही, आमच्यासाठी काहीतरी करा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्यामुळे मुख्याध्यापिकेला निलंबित करण्याची मागणी शिक्षणमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.