१०१ पंचायती मतदानास सज्ज
By admin | Published: April 17, 2016 01:02 AM2016-04-17T01:02:53+5:302016-04-17T01:02:53+5:30
जिल्ह्यातील १२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपैकी २१ ग्रा.पं.चे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. उर्वरित १०१ ग्रा.पं.साठी ३१० मतदान केंद्रांवर रविवार, १७ एप्रिल रोजी मतदान
ठाणे: जिल्ह्यातील १२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपैकी २१ ग्रा.पं.चे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. उर्वरित १०१ ग्रा.पं.साठी ३१० मतदान केंद्रांवर रविवार, १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी संबंधित गावपाड्यांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मतदानासाठी सज्ज झालेल्या १०१ ग्रा.पं.च्या निवडणुकांसाठी एक हजार ६०४ उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब आजमावत आहेत. यातून ६४७ उमेदवारांची सदस्य म्हणून निवड होणार आहे. विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वापरलेल्या मतदार यादीतील त्यात्या गावांतील मतदार या ग्रा.पं.ला मतदान करणार आहेत. तर, दोन ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकीसाठीदेखील मतदान केले जाणार आहे.
या वेळी १०१ ग्रा.पं.साठी हजारो मतदार ३१० मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत. त्यासाठी ६३५ व्होटिंग मशिन्स वापरल्या जाणार आहेत. रविवारी मतदान होणाऱ्या या ग्रा.पं.ची मुदत मे ते आॅगस्टदरम्यान संपणार आहे. तत्पूर्वी त्यांच्या मुदतपूर्व निवडणुका हाती घेतल्या आहेत. निवडणुकीला उभ्या असलेल्या या एक हजार ६०४ उमेदवारांना होणाऱ्या मतदानाची मतमोजणी १८ एप्रिलला संबंधित तहसीलदारांच्या नियंत्रणात होणार आहे. गुरुवारची चैत्र अमावस्या असल्यामुळे या उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडण्याची हिंमत केली नव्हती. पण, गुढीपाडव्याचा सर्वोत्तम मुहूर्त साधून उमेदवारांनी प्रचार सुरू केला होता. यामुळे उमेदवारांना जेमतेम ११ दिवस प्रचारासाठी मिळले होते. मात्र, अमावस्येच्या भीतीने उमेदवारांनी दोन दिवस प्रचार करणे थांबवले होते. यामुळे केवळ नऊ दिवसच त्यांना प्रचारासाठी मिळाले आहेत. त्यादरम्यान मतदारांना विविध आश्वासनांची खैरात करून आपल्या दिशेने त्यांचे मतदान वळवण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला आहे.
या निवडणुकीत शहापूर तालुक्यात सर्वाधिक ६७ ग्रा.पं., मुरबाडच्या २९, भिवंडीमधील २७ आणि अंबरनाथ तालुक्यातील एका ग्रा.पं.चा समावेश आहे.