ठाणे महासभेच्या पटलावर विकासकामांचे १०१ प्रस्ताव
By admin | Published: January 20, 2016 01:56 AM2016-01-20T01:56:11+5:302016-01-20T01:56:11+5:30
मागील तीन वर्षे बजेटच्या प्रतिक्षेत असलेल्या नगरसेवकांना बुधवारच्या महासभेच्या निमित्ताने काहीसे समाधान मिळणार आहे.
ठाणे : मागील तीन वर्षे बजेटच्या प्रतिक्षेत असलेल्या नगरसेवकांना बुधवारच्या महासभेच्या निमित्ताने काहीसे समाधान मिळणार आहे. या महासभेत गटार, पायवाटा, चौक सुशोभिकरण, रस्ते, नाल्यावर स्लॅब टाकणे, फुटपाथ, शौचालय दुरुस्ती, शाळा दुरुस्ती, आरोग्य सेवा, शरद पवार स्टेडीयम, भाजी मंडई, दलित वस्ती सुधारणा निधी आदींसह तब्बल १०१ प्रस्ताव प्रथमच चर्चेसाठी पटलावर ठेवून प्रशासनाने नगरसेवकांना गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मागील तीन वर्षांपासून प्रभागातील रखडलेली कामे या निमित्ताने मार्गी लागणार आहेत.
मागील तीन वर्षांपासून महापालिकेत घडलेल्या राजकीय स्थित्यंतरामुळे आणि जकात गेल्यानंतर आलेल्या एलबीटीमुळे पालिकेची आर्थिक घडी संपूर्णपणे विस्कटलेली होती. कर्मचाऱ्यांचा पगार निघेल का नाही अशी परिस्थितीही निर्माण झाली होती.
ठेकेदारांचाही रांगा पालिकेत लागत होत्या. त्यात स्थायी समिती आणि महासभेत प्रभागातील कामे रखडल्याच्या मुद्यावरुन अनेक वेळा वादंग निर्माण झाले होते. बजेट मिळत नसल्याने काही नगरसेवकांनी आंदोलनेदेखील केली. विशेष म्हणजे मागील तीन वर्षे महासभेने मंजूर केलेले बजेटही अंतिम झाले नव्हते. मागील वर्षी तर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारच्या नव्या प्रकल्पांची घोषणा केली नव्हती. उलट पालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या अनुषंगाने मालमत्ताकरासह अनेक बाबींवर कर वाढविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, हे अंदाज पत्रक मंजूर होण्यासाठी सुद्धा सप्टेंबरचा महिना उजाडला. त्यामुळे अनेक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. येत्या वर्षभराच्या कालावधीत ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका येऊ घातल्या आहेत. (प्रतिनिधी)