१०१ वर्षांच्या आजींनी दिला सूर्यनमस्काराचा कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 01:18 AM2020-02-02T01:18:01+5:302020-02-02T01:18:30+5:30

१० हजार ६२२ विद्यार्थ्यांनी घातले एक लाख ३८ हजार ८६ सूर्यनमस्कार

101 year-old grandmother gave the earrings of Suryanamaskar | १०१ वर्षांच्या आजींनी दिला सूर्यनमस्काराचा कानमंत्र

१०१ वर्षांच्या आजींनी दिला सूर्यनमस्काराचा कानमंत्र

googlenewsNext

कल्याण : रत्नागिरी जिल्ह्यातील १०१ वर्षांच्या लक्ष्मीबाई दामले आजींनी शनिवारी शहरातील ५४ शाळांमधील १० हजार ६२२ विद्यार्थ्यांसह सामूहिक सूर्यनमस्कार घातले. यावेळी त्यांनी सुदृढ व निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी सूर्यनमस्कार हेच औषध असल्याचा कानमंत्र यावेळी उपस्थितांना दिला.

कल्याण-डोंबिवली महापालिका, महिला-बालकल्याण समिती आणि सुभेदारवाडा कट्ट्याने सूर्यनमस्कार दिनानिमित्त पश्चिमेतील सुभाष मैदानावर सामूहिक सूर्यनमस्काराचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून दामले आजी उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी या वयात व्यासपीठावर सूर्यनमस्कार घालून उपस्थितांना आश्चर्यचकित केले.

या कार्यक्रमप्रसंगी महापौर विनीता राणे, महिला व बालकल्याण समिती सभापती वीणा जाधव, माजी आमदार नरेंद्र पवार, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण, ‘ओएमजी’ रेकॉडर््सचे प्रा. दिनेश गुप्ता, गजानन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कांचन भालेराव, क्रीडाभारतीच्या कल्याण शाखेचे सचिव महादेव क्षीरसागर, नगरसेवक अरुण गीध, माजी नगरसेवक गणेश जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गामातेचे दर्शन घेऊन खेळाडू साधिन्य मोरे याच्या हस्ते ज्योत सुभाष मैदान येथे आणण्यात आली. त्यानंतर दामले आजी व उपस्थितांनी सूर्यदेवतेच्या प्रतिमेचे पूजन केले.

जाधव म्हणाल्या की, ‘सूर्यनमस्कारामुळे आरोग्य चांगले राहते. दामले आजींकडून प्रेरणा घेऊन सर्वांनी रोज सूर्यनमस्कार घालावेत.’ तर, ‘शंभर वर्षे आयुष्य जगायचे असल्यास रोज सूर्यनमस्कार घालावेत’ असे आवाहन पवार यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा जयवंत आणि शिवछत्रपती पुरस्कारविजेते अंकुर आहेर यांनी केले. या कार्यक्रमाला क्रीडाभारती कल्याण शाखा, अनिरुद्ध बापू डिझॅस्टर मॅनेजमेंट सेल, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ, सर्व शाळा, मुख्याध्यापक तसेच क्रीडा शिक्षकांचे सहकार्य लाभले.

वयाच्या सातव्या वर्षांपासूनचा शिरस्ता

वयाच्या सातव्या वर्षांपासून मी सूर्यनमस्कार घालण्यास सुरुवात केली. आजही दररोज न चुकता घालत आहे. सर्वांनी वेळ आणि अडचणींवर मात करून सूर्यनमस्कार घातले पाहिजेत, असे दामले आजींनी सांगितले. माझ्यासारखे निरोगी शरीर ठेवायचे असेल तर प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना लहानपणापासूनच सूर्यनमस्कार घालायला सांगितले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित पालकांना केले.

सूर्यनमस्कार हेच आजींचे औषध

यावेळी महापौर विनीता राणे म्हणाल्या की, ‘लहानपणापासून सूर्यनमस्कार घालणाऱ्या दामले आजींनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे औषध घेतले नाही. सूर्यनमस्कार हेच त्यांचे औषध. त्या औषधाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांनी दिवसातून एकदा सूर्यनमस्कार घातल्यास त्यांना कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाहीत. आरोग्य निरोगी व तंदुरुस्त राहील.’

Web Title: 101 year-old grandmother gave the earrings of Suryanamaskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.