ठाण्यात अतिधोकादायक इमारतींची संख्या १0३
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 01:54 AM2019-05-10T01:54:23+5:302019-05-10T01:55:00+5:30
ठाणे महापालिकेच्या हद्दीत गतवर्षी अतिधोकादायक असलेल्या ९५ इमारतींच्या यादीत आणखी ८ इमारती भर पडल्याने ही संख्या यावर्षी १०३ वर गेली आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या हद्दीत गतवर्षी अतिधोकादायक असलेल्या ९५ इमारतींच्या यादीत आणखी ८ इमारती भर पडल्याने ही संख्या यावर्षी १०३ वर गेली आहे. यामध्ये कोपरी आणि नौपाडा या प्रभाग समितीमध्ये ४६ अतिधोकादायक इमारतींचा समावेश आहे. तर अतिधोकादायक इमारती या जुन्या ठाणे शहरात जास्त आहेत. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने या सर्व अतिधोकादायक इमारती येत्या ३१ मे पर्यंत खाली करण्यात येतील, असे म्हटले आहे. यामुळे या इमारतींत राहणाऱ्या शेकडो रहिवाशांवर ऐन पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ येणार आहे. शिवाय शहरात धोकादायक इमारतींची संख्याही ४ हजार ५०७ इतकी असून त्यामध्ये सर्वात जास्त मुंब्रा-कळवा, वागळे इस्टेट या परिसरात आहेत. तर येत्या काही वर्षांत ही वाढण्याची भीतीही वर्तवली जात आहे
लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत महापालिकेचे सर्वच विभाग निवडणूक कामकाजाच व्यस्त होते. ज्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रात धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्व्हेक्षण एप्रिल महिन्यात होणे अपेक्षित होते. मात्र, ते सर्व्हेक्षण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आले. त्यानुसार शहरात १०३ इमारती अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. गेल्यावर्षी हा आकडा ९५ होता. त्यामध्ये सर्वात अधिक अतिधोकादायक इमारती ठाणे शहरात म्हणजे कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती परिसरात आहेत. गेल्या वर्षी या दोन्ही प्रभाग समितीत अतिधोकादायक इमारतीची संख्या ३७ होती ती आता ४५ वर गेली आहे.
संघर्ष होण्याची शक्यता
अतिधोकादायक इमारती खाली करण्यासाठी महापालिकेने ३१ मे ची डेडलाइन दिली आहे. यामुळे या इमारतींत राहणाºया शेकडो कुंटुंबावर बेघर होण्याची वेळ येणार आहे. शहरात इतक्या मोठ्याप्रमाणात संक्रमण शिबिरे नसल्याने महापालिका व या रहिवाशांतील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. अतिधोकादायक इमारतींची संख्या कोपरी आणि नौपाडा भागात जास्त आहे.