टीडीसीसी बँक निवडणुकीत १०३ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 12:11 AM2021-03-05T00:11:45+5:302021-03-05T00:11:55+5:30
आज छाननी : विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह सहा जण बिनविरोध विजयी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) २१ संचालक पदांसाठी निवडणूक होत असून, गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी १०३ जणांनी त्यांचे २०६ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह आधीचे तीन संचालक आणि दोन नवीन अशा सहा जणांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे ते बिनविरोध विजयी झाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.
प्राथमिक कृषी पतपुरवठा वसई तालुका या मतदारसंघातून अध्यक्ष पाटील बिनविरोध विजयी झाले. याशिवाय अंबरनाथचे विद्यमान संचालक राजेश पाटील, जव्हारचे दिलीप पटेकर यांच्यासह ठाण्यातील विद्यमान संचालक बाबाजी पाटील विजयी झाले आहेत.
याशिवाय प्रथमच आणि बिनविरोध विजयी होणाऱ्यांमध्ये माजी आमदार अमित घोडा हे असून, ते डहाणू मतदारसंघातून विजयी झाले. त्यांचे वडील व माजी आमदार कृष्णा घोडा या मतदारसंघातून विजयी होत असत. याप्रमाणे मोखाडा तालुक्यातून बाबुराव दिघा हे प्रथमच बिनविरोध विजयी झाले आहेत.
या मतदारसंघातून ॲड. देवीदास पाटील निवडून येत असत. पाटील यांचे निधन झाले. बिनविरोध विजयी झालेल्यांमधील पाच संचालक आमचेच असल्याचा दावा विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’कडे केला.
टीडीसीसी बँकेच्या २१ जणांच्या संचालक मंडळासाठी ३० मार्च रोजी मतदान होऊन मतमोजणी ३१ मार्च रोजी पार पडणार आहे. शेवटच्या दिवसापर्यंत प्राप्त झालेल्या २०६ उमेदवारी अर्जांची छाननी उद्या (शुक्रवार) ५ मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर या निवडणुकीच्या रिंगणातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल. ८ ते २२ मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत हाेती.
या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची दाट शक्यता आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी उमेदवारी मागे घ्यावी, याकरिता मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. २२ मार्चनंतर २१ जागांकरिता नेमके किती उमेदवार रिंगणात व कोण बिनविरोध निवडून आले, ते स्पष्ट होईल.
nराज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये श्रीमंत बँक म्हणून टीडीसीसी बँकेचा लौकिक आहे. या बँकेची वार्षिक उलाढाल तब्बल साडेदहा हजार कोटींची आहे.
nमहाविकास आघाडीतील पक्ष म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी त्यांचे समर्थक निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. सत्ताधारी बँक संचालकांकडून या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
nबहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांचे कट्टर समर्थक विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील बिनविरोध विजयी झाले. मात्र, विद्यमान उपाध्यक्ष भाजपचे भाऊ कुऱ्हाडे यांच्या पतसंस्थांच्या मतदारसंघात त्यांना तब्बल १३ इच्छुकांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यापैकी किती माघार घेणार, त्यावर भाजपच्या संचालकांचे भवितव्य अवलंबून आहे.