रस्त्यांच्या साफसफाईवर दोन वर्षात होणार १०३ कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:14 AM2021-03-13T05:14:24+5:302021-03-13T05:14:24+5:30
ठाणे : एकीकडे कोरोनामुळे आर्थिक स्थिती खालावली असल्याने ठाणे महापालिकेने काही महत्त्वाच्या प्रकल्पांना कात्री लावली आहे. परंतु, दुसरीकडे ...
ठाणे : एकीकडे कोरोनामुळे आर्थिक स्थिती खालावली असल्याने ठाणे महापालिकेने काही महत्त्वाच्या प्रकल्पांना कात्री लावली आहे. परंतु, दुसरीकडे शहरातील रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी आपले सफाई कामगार कमी पडत असल्याचे सांगून खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून तब्बल १०२ कोटी ६६ लाख ३५ हजार ८६४ रुपयांचा चुराडा करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी १०४० कामगारांची नियुक्ती केली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या १९ मार्चच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या आजघडीला २५ लाखांच्या आसपास असून, शहरात निर्माण होणारा कचराही वाढत आहे. परंतु, त्या दृष्टीने रस्त्यांची सफाईसाठी अवघे २९९० कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आहे. यापूर्वीदेखील ठेकेदाराने नेमलेल्या सफाई कामगारांकडून हे काम केले जात होते. त्याचा कालावधी ३१ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे कामाची निकड लक्षात घेऊन पुन्हा दोन वर्षांच्या कालावधीसाठी निविदा मागविली आहे. त्यानुसार यामध्ये १०१७ कामगार आणि २३ पर्यवेक्षक असे १०४० कामगार घेतले जाणार आहेत. हे कामगार २३ गटात काम करणार आहेत. रस्ते सफाई करताना दोन किंवा तीन कामगारांचा गट करून ज्या ठिकाणी दोन कामगारांचा गट काम करतो.
दरम्यान, दुसरीकडे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत चार पदरी रस्त्यांची सफाई स्विपिंग मशीनद्वारे करणे अपेक्षित आहे. तसेच हायप्रेशर एअर ब्लोअरसाठी दोन ऑपरेटर व स्विपिंग मशीनच्या ऑपरेटिंगसाठी दोन ऑपरेटर घेणे गरजेचे आहे. त्यानुसार या संदर्भात प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी २२ गट रस्ते सफाईसाठी दोन वर्षासाठी ८४ कोटी ४७ लाख आठ हजार १८४ रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे तर एका गटात मशीनद्वारे सफाईसाठी दोन वर्षांसाठी १८ कोटी १९ लाख २७ हजार ६८० रुपयांचा असा एकूण मिळून १०२ कोटी ६६ लाख ३५ हजार ८६४ रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
सध्या कोरोनाचा कहर सुरू असून, महापालिका आपली आर्थिक स्थिती आजही सावरू शकलेली नाही. त्यामुळे काही विकास प्रकल्पांना कात्री लावली आहे तर काही गुंडाळले आहेत. असे असताना रस्त्यांच्या सफाईसाठी एवढा खर्च कशासाठी असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.