मोफत प्रवेशासाठीचे 10,374 अर्ज बाद; तुम्हाला एसएमएस आला नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 12:22 PM2022-03-19T12:22:40+5:302022-03-19T12:25:02+5:30

‘शिक्षणाचा हक्क’ अंतर्गत प्रवेश : वयाच्या अटीचे पालन सक्तीचे

10,374 applications for free admission rejected; You didn't receive an SMS, did you? | मोफत प्रवेशासाठीचे 10,374 अर्ज बाद; तुम्हाला एसएमएस आला नाही ना?

मोफत प्रवेशासाठीचे 10,374 अर्ज बाद; तुम्हाला एसएमएस आला नाही ना?

Next

- सुरेश लोखंडे

ठाणे : ‘शिक्षणाचा हक्क’(आरटीई) या कायद्याखाली उत्तम व उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांसाठी २५ टक्के शालेय प्रवेश आरक्षित ठेवले आहेत. त्यासाठी आलेल्या ३६ हजार ७६ बालकांच्या अर्जांपैकी १० हजार ३७४ अर्ज विविध कारणांखाली बाद ठरवले आहेत. उर्वरित २५ हजार ७०२ बालकांचे अर्ज ग्राह्य धरून त्यांची नोंद घेतली आहे; पण ज्या बालकांच्या अर्जाची नोंद घेतली नाही त्यांना मात्र लॉटरी सोडतीमध्ये नंबर लागल्याचा एसएमएस जाणार नसल्यामुळे त्यांना या प्रक्रियेविषयी आता काहीही माहिती मिळणार नसल्याचे उघड झाले आहे.  

या शालेय प्रवेशासाठी अर्ज दाखल केलेल्या पालकांना त्यांच्या अर्जातील दुरुस्ती करून ते पुन्हा ऑनलाइन पाठवण्याची संधी देऊन त्यासाठी १० मार्चपर्यंत मुदत दिली होती.  आता पात्र अर्जदारांची  लॉटरी सोडत काढून  शालेय प्रवेशासाठी निवड करण्यात येणार आहे. मात्र, या लॉटरी सोडतीची तारीख अजूनही निश्चित झालेली नाही. त्यामुळे बालकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या शालेय प्रवेशासाठी यंदापासून वयाच्या अटीचे पालन करणे सक्तीचे केले आहे.  

आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यात एकूण पात्र शाळा 
यंदाच्या शैक्षणिक वर्षाकरिता एकूण ६४८ शाळा जिल्ह्यात निश्चित केल्या आहेत. यामध्ये इयत्ता पहिलीसाठी ११ हजार ४६९ व पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी ७९८ जागा उपलब्ध आहेत. या एकूण १२ हजार २६७ बालकांना मोफत प्रवेश देण्याचे नियोजन केले आहे. 

लॉटरी सोडत निघणार कधी? 

या मोफत शालेय प्रवेशासाठी जिल्ह्यातील २५ हजार ७०२ अर्ज ग्राह्य धरले आहेत. त्यातील बालकांची लॉटरी सोडतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. या सोडतीला अजून तरी प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे पालकांचे आता त्याकडे लक्ष लागून आहे. या सोडतीचा दिनांक निश्चित झालेला नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे; पण पुढील आठवडाभरात या लॉटरी सोडतीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

Web Title: 10,374 applications for free admission rejected; You didn't receive an SMS, did you?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.