कळवा रुग्णालयात सात महिन्यांत १,०६१ मृत्यू; मागील वर्षीच्या तुलनेत ३२५ अधिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 06:11 AM2023-08-15T06:11:01+5:302023-08-15T06:11:20+5:30

मागील १४ दिवसांत सुमारे ५० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला.

1061 deaths in kalwa hospital in seven months 325 more deaths than last year | कळवा रुग्णालयात सात महिन्यांत १,०६१ मृत्यू; मागील वर्षीच्या तुलनेत ३२५ अधिक मृत्यू

कळवा रुग्णालयात सात महिन्यांत १,०६१ मृत्यू; मागील वर्षीच्या तुलनेत ३२५ अधिक मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मागील सात महिन्यांत तब्बल १०६१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मागील १४ दिवसांत सुमारे ५० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. उपचारार्थ दाखल झालेल्या सरासरी एक हजार रुग्णांमागे मृत्यूचे प्रमाण हे ५१ ते ५४ असे आहे. 

कळवा रुग्णालयात ठाण्यासह पालघर, मुंबई येथूनही रुग्ण उपचारासाठी येतात. मागील काही महिन्यांत रुग्णालयावरील ताण वाढला आहे. ओपीडीत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या १५०० वरून दोन हजारांच्या घरात गेली. मागील आठवड्यात गुरुवारी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपर्यंत आणखी १८ रुग्णांची भर पडली. जानेवारी ते जुलै २०२३ या सात महिन्यांत १०६१ रुग्णांचा मृत्यू या रुग्णालयात झाला. २०२२ मध्ये जानेवारी ते जुलै या कालावधीत ७३६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद कळवा रुग्णालयात झाली होती. यंदा त्यात ३२५ रुग्णांची अधिकची भर पडली. २०२२ मध्ये जानेवारी ते डिसेंबरपर्यंत १३३६ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

१४ हजार रुग्णांना डिस्चार्ज

मागील वर्षी जानेवारी २०२२  ते जुलै २०२२ या सात महिन्यांच्या कालावधीत विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी १६ हजार ९६९ रुग्ण दाखल झाले, तर उपचाराअंती १४ हजार ६२६ रुग्णांना सोडून देण्यात आले. यापैकी ३ हजार २४२ प्रसुती करण्यात आली. तसेच याच कालावधीत ७३६ रुग्णांचा मृत्यू झाला.

यंदाच्या वर्षी जानेवारी २०२३ ते जुलै २०२३ या कालावधीत विविध आजारांवर उपचार घेण्याबरोबरच शस्त्रक्रियेसाठी २१ हजार ६०६ रुग्ण दाखल झाले. उपचाराअंती १८ हजार ४१३ रुग्णांना सोडून देण्यात आले होते. ३, २६५ प्रसूती करण्यात आली. याच कालावधीत एक हजार ६१ रुग्णांचा मृत्यू झाला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ३२५ ने मृत्यू वाढले.

रुग्णालयाचे अनेक भाग खासगी संस्थेला आंदण

कळवा रुग्णालयात खासगी संस्थेला डायलिसिससाठी जागा देण्यात आली आहे. तसेच सीटी स्कॅन व इतर टेस्टसाठी जागा खासगी संस्थेला दिली आहे. कमी खर्चात येथे सिटी स्कॅन केले जात असल्याचा दावा करण्यात येतो परंतु रुग्णालयाचे अनेक भाग हे खासगी संस्थेला आंदण दिले आहेत. या निर्णयांना तत्कालीन अधिष्ठातांनी विरोध केला होता म्हणून त्यांचीच उचलबांगडी करण्यात आली होती.

त्रुटी सुधारण्यावर भर द्या; तज्ज्ञांचे मत

कालची घटना हे प्रशासनाचे अपयश आहे की सांगता येत नाही; परंतु मृत्यू होण्यामागे वेगवेगळी कारणे असतात. अशा घटनांमध्ये दरवेळी हलगर्जीपणा असतोच असे नाही. हे मी सायन हॉस्पिटलमधील २८ वर्षांच्या अनुभवाने सांगतो. एखाद्या ठिकाणी हलगर्जीपणा होऊ शकतो. कळवा रुग्णालयाच्या घटनेत विविध आजारांचे रुग्ण होते. ठरावीक वॉर्डात घटना घडलेली नाही. अशा घटना प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कधी ना कधी होऊ शकतात. त्यांना अनेक कारणे असू शकतात. - डॉ. विनोद इंगळहळीकर, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ.

कोणतेही रुग्णालय हे रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्नच करत असते; पण सरकारी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची आर्थिक स्थिती आणि अनेक ठिकाणी फिरून आल्यावर झालेली गंभीर अवस्था यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही काही वेळा त्यांना वाचविणे हे मानवी प्रयत्नांच्या पलीकडे असते. अशा वेळी डॉक्टर, प्रशासन आणि अतिरिक्त ताण पडलेले कर्मचारी यांच्यावर आरोप करणे चुकीचे असून त्यासाठी जनसामान्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. - डॉ. उदय कुलकर्णी, ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ.

कळवा रुग्णालय ठाण्यातले  मोठे रुग्णालय असून, ते आणखी सुसज्ज होण्याची गरज आहे; परंतु सरसकट सगळ्यांना दोष देण्यापेक्षा चौकशीत जे दोषी आढळतील केवळ त्यांच्यावरच कारवाई झाली पाहिजे. अशा घटनांत राजकारण आणून काही होत नाही, उलट सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावे, रुग्णालयातील त्रुटी कशा सुधारता येतील याचा अभ्यास प्रशासनाने करावा. चौकशी अहवाल येईपर्यंत कोणाला दोष देता कामा नये. - डॉ. महेश बेडेकर, सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ.


 

Web Title: 1061 deaths in kalwa hospital in seven months 325 more deaths than last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.