एमपीएससीच्या परीक्षेला शनिवारी ठाण्यात १०,७०७ परीक्षार्थी
By सुरेश लोखंडे | Published: October 7, 2022 07:14 PM2022-10-07T19:14:54+5:302022-10-07T19:15:11+5:30
एमपीएससीच्या परीक्षेला शनिवारी ठाण्यात १०,७०७ परीक्षार्थी येणार आहेत.
ठाणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्वपरीक्षा शनिवार, ८ ऑक्टोबरला ठाण्यात होणार आहे. शहरातील ३१ परीक्षा केंद्रांवर १० हजार ७०७ परीक्षार्थी आपले नशीब अजमावणार आहेत. एमपीएससीची ही परीक्षा सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान होणार आहे. त्यासाठी ३१ केंद्रांवर ९०० अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत. याशिवाय चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
त्यामुळे परीक्षेदरम्यान अनुचित घटनेला पायबंद घालता येणार आहे. यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरात मनाई आदेश जारी केल्याची माहिती उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली. या परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात बेकायदा जमावास मज्जाव करण्यात आला, तर झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बूथ, दुकाने, सेवा बंद ठेवण्यासह मोबाइल फोन वापर करण्यास मनाई केली आहे.