ठाणे जिल्ह्यात १०७५ मिमी पावसाने अनेक रस्ते, पूल पाण्याखाली, घरे, दुकानांमध्ये पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:27 AM2021-07-20T04:27:17+5:302021-07-20T04:27:17+5:30
ठाणे : जिल्ह्यातील सर्व सात तालुक्यांत गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सर्वाधिक एकूण एक हजार ७५ मिमी पाऊस पडला आहे. ...
ठाणे : जिल्ह्यातील सर्व सात तालुक्यांत गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सर्वाधिक एकूण एक हजार ७५ मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात हा सरासरी १५२ मिमी पाऊस झाल्याने नदीनाल्यांना पूर येऊन शहरांसह ग्रामीण भागातील अनेक रस्ते, पूल पाण्याखाली आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर उल्हासनदीने सोमवारी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे कल्याण तालुक्यातील म्हारळगाव, कांबा, वरप गावातील ही निवासी भागात पाणी घुसले. भिवंडी शहर, ठाण्याचा दिवा परिसरात अनेक चाळींत पाणी घुसले असून डोंबिवली स्टेशन परिसरातील दुकानांतही पावसाचे पाणी शिरले आहे. महापे-शीळ-कल्याण मार्गही बंद ठेवण्यात आला आहे.
पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर होता. भातसा धरणात आज ४५ टक्के पाणीसाठा तयार झाला तर बारवीत ४४ पक्के पाणीसाठा गेल्या २४ तासांत वाढला आहे.
कसारा येथील शिवाजीनगरमध्ये दोन कच्ची घरे पडली असून तेथील लोकांना जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित केले आहे. याच परिसरात रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने उपनगरीय वाहतूक बंद झाली होती. तर या कसारा घाटातील महामार्गावर दरड कोसळली होती. यामुळे काही काळ वाहतूक कोंंडी झाली. कल्याणच्या टिटवाळा नजीकचा रुंदे पूल काळू नदीच्या पाण्याखाली गेला आहे. तर वज्रेश्वरी नजीक भातसा नदीवरील वालकस पूलही पाण्याखाली गेला आहे. तानसानदीच्या पुरामुळे बेलवड पुलावरून पाणी वाहू लागल्याने खर्डी वाडा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. वासिंद नजीकच्या रेल्वे मार्गाखालील मार्गिकेत पाणी साचल्याने परिसरातील ४४ गावांचा संपर्क तुटला आहे.
शहरी भागासह ग्रामीण भागात दिवसभर पाऊस संततधार कोसळला. यात ठाणे शहर परिसरात सरासरी १५२.६ मिमी, तर कल्याणला १७७.५ मिमी., मुरबाडला ९७.५ मिमी. पाऊस पडला आहे. तर भिवंडीला १८०.५ मिमी, शहापूरला १६८ मिमी पाऊस पडला असून उल्हासनगरला १४९.५ मिमी आणि अंबरनाथला १४६ पाऊस पडलेला आहे. जिल्ह्यात हा सरासरी १५२ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.