अवघ्या सात दिवसांत १०९७५ बाटल्या रक्तसंकलन; ६५ हून अधिक ब्लड बँकांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 09:00 PM2021-10-14T21:00:12+5:302021-10-14T21:00:51+5:30
एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित महारक्तदान सप्ताहाला तुफान प्रतिसाद
ठाणे – रक्तदान हे पुण्याचे काम असून आपल्या एक बाटली रक्तामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी अद्याप प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या रक्त तयार करता येत नाही. त्यामुळे माणसालाच माणसाचा जीव वाचवण्याचे काम करायचे असून अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे केले.
राज्यभरात असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन नवरात्रीचे औचित्य साधून श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाण्यातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित महारक्तदान सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रक्तदात्यांनी या महारक्तदान सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे सात दिवसांत तब्बल १० हजार ९७५ बाटल्या रक्तसंकलन करण्यात यश आले. भिवंडीचे विनीत म्हात्रे हे दहा हजारावे रक्तदाते ठरले.
समारोपाला विशेष पाहुणे म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे उपस्थित होते. राज्याला रक्ताची निकड असताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन या महारक्तदान सप्ताहाचे आयोजन करून तब्बल १० हजार ९७५ बाटल्या रक्तसंकलन केल्याबद्दल राजेश टोपे यांनी श्री. शिंदे यांचे अभिनंदन केले. गुरुवारी अखेरच्या दिवशी राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे, अनिल देसाई, आमदार महेश शिंदे यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांशी संवाद साधला.
आमदार रवींद्र फाटक, ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनीही गुरुवारी रक्तदान केले. या महारक्तदान सप्ताहाला ८ ऑक्टोबर रोजी सुरुवात होण्यापूर्वी, म्हणजे ७ ऑक्टोबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांतील ब्लड बँकांमध्ये एकूण १० हजार ४०० बाटल्या इतका रक्तसाठा उपलब्ध होता. शिवसेना ठाणे व पालघर जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या महारक्तदान सप्ताहात अवघ्या सात दिवसांत १० हजार ९७५ बाटल्या रक्तसंकलन झाल्यामुळे या ब्लड बँकांना, तसेच रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी याबद्दल श्री. एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यभरात केवळ १० दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध होता. त्यामुळे अशा प्रकारच्या रक्तदान शिबिरांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असून शिवसेनेने आयोजित केलेल्या या महारक्तदान सप्ताहात अवघ्या सात दिवसांतच १० हजार ९७५ बाटल्या रक्तसंकलन झाल्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील रुग्णांना आणि ब्लड बँकांना निश्चितच दिलासा मिळेल, असे डॉ. थोरात म्हणाले.
या समारोपासाठी आवर्जून उपस्थित असलेले अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले की, मी स्वतः नियमित रक्तदाता असून रक्तदानासारखे दुसरे पुण्यकर्म नाही. आपल्या एक बाटली रक्तामुळे कोणाचा तरी जीव आपण वाचवू शकलो, ही भावनाच कमालीची सुखावणारी असते. त्यामुळे राज्याची निकड लक्षात घेऊन या महारक्तदान सप्ताहाचे इतक्या भव्य प्रमाणावर आयोजन करणारे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे मी शतशः आभार मानतो. कुठलेही आव्हान पेलणारा नेता म्हणून त्यांची कीर्ती ऐकून होतो, पण या महारक्तदान सप्ताहाला जे यश मिळाले आहे, त्यातून त्याची प्रचीती आले.
या महारक्तदान सप्ताहाच्या यशस्वी आयोजनात योगदान देणारे डॉक्टर्स, ब्लड बँकांचे प्रतिनिधी, आरोग्य सेवक, शिवसेनेचे निवडक पदाधिकारी यांचा देखणे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिवसेना ठाणे व पालघर जिल्हा शाखेच्या वतीने राज्य रक्त संक्रमण परिषद, ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जे. जे. महानगर ब्लड बँक आदींच्या सहकार्याने आयोजित या महारक्तदान सप्ताहात ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा रोड, भाईंदर, नालासोपारा, वसई, विरार, पालघर, डहाणू, जव्हार, मोखाडा, शहापूर, भिवंडी आदी सर्व ठिकाणच्या रक्तदात्यांनी रक्तदान केले.
ठाणे शहर पोलिस, तसेच ग्रामीण पोलिस, ठाणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, घनकचरा विभागाचे सफाई कर्मचारी, ग्लोबल हॉस्पिटल, तसेच पार्किंग प्लाझा येथील कोव्हिड हॉस्पिटलचे डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी, आरोग्य सेवक अशा विविध घटकांनी रक्तदान करून आपले योगदान दिले. स्वतः एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, अभिनेते कुशल बद्रिके, ठाणे शहराचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पवार, वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील, परिमंडळ एकचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांनीही रक्तदान केले. याशिवाय शीघ्र कृती दलाचे कमांडो देखील रक्तदानात सहभागी झाले. कृषी मंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, अभिजीत चव्हाण आदींनी आवर्जून उपस्थित राहून रक्तदात्यांशी संवाद साधला.
या महारक्तदान सप्ताहाच्या यशस्वी आयोजनात योगदान देणारे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, शहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांचे महापौर नरेश म्हस्के यांनी आभार मानले. या सर्वांमुळेच हा स्तुत्य उपक्रम यशस्वी होऊ शकला, असे श्री. म्हस्के म्हणाले. याप्रसंगी खा. राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, शांताराम मोरे, महापौर नरेश म्हस्के, ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.