कल्याण-डोंबिवलीचे दहावीत १०० टक्के यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 01:53 AM2019-05-07T01:53:55+5:302019-05-07T01:54:24+5:30
सीबीएसई बोर्डाने घेतलेल्या दहावीचा परीक्षेत डोंबिवलीतील ओमकार विद्यालय व एंजल्स शाळा तर, कल्याणमधील आर्य गुरूकुल शाळेचाही निकाल १०० टक्के लागला आहे.
डोंबिवली : सीबीएसई बोर्डाने घेतलेल्या दहावीचा परीक्षेत डोंबिवलीतील ओमकार विद्यालय व एंजल्स शाळा तर, कल्याणमधील आर्य गुरूकुल शाळेचाही निकाल १०० टक्के लागला आहे. ‘ओमकार’मधील श्रेयस करोली व रोहित नलावडे या विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये तर, होली एंजल्स शाळेतील धनशिता देसाई हिने सामाजिकशास्त्र या विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत.
‘ओमकार’मधील ४० विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिली होती. त्यात सात विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. ८० ते ९० टक्क्यांपेक्षा अधिक १२ विद्यार्थ्यांनी, तर ७० ते ८० टक्क्यांपेक्षा ११ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. श्रेयस आणि रोहित यांनी संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. श्रेयस हा ९५.०४ टक्के गुण मिळवून शाळेतही प्रथम आला आहे. आदिती सिंग ही ९५. ०२ टक्के गुणांसह द्वितीय तर हृदया शिवराजन ही ९३.०८ टक्के गुणांसह तृतीय आली आहे, अशी माहिती शाळेच्या संचालिका दर्शना सामंत यांनी दिली.
होली एंजल्स शाळेतून १४१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ते सर्वजण उत्तीर्ण झाले आहेत. अभिनव अय्यर याने ९७.२० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. शाळेतील २२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. धनशिता हिने सामाजिक शास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत, अशी माहिती शाळेचे संचालक ओमीन डेव्हीड यांनी दिली.
मुलींनी मारली बाजी
कल्याणच्या आर्य गुरूकुल शाळेत वेदिका चव्हाण ही ९७.६० टक्के गुणांसह प्रथम आली आहे. तनिषा टेमघरे (९७.४०) द्वितीय, तर श्रेया पारख (९६.४०) तृतीय आली आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका राधामणी अय्यर यांनी दिली.