४०० खाटाच्या रुग्णालयासाठी ११ कोटीचे साहित्य, उल्हासनगर महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय उभारण्याचे स्वप्न पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 04:27 PM2021-07-14T16:27:12+5:302021-07-14T16:28:02+5:30
Ulhasnagar Municipal Corporation: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी उल्हासनगर महापालिका ४०० खाटाचे दोन रुग्णालय उभारणार असून रुग्णालय व लॅब साठी तब्बल ११ कोटीचे साहित्य खरेदी करणार आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महापालिका ४०० खाटाचे दोन रुग्णालय उभारणार असून रुग्णालय व लॅब साठी तब्बल ११ कोटीचे साहित्य खरेदी करणार आहे. गुरवारी होणाऱ्या स्थायी समिती बैठकीत निविदा विना साहित्य खरेदीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, साहित्या मधील एका बेडशीटची किंमत ६०० तर पिलो ९०० रुपये दाखविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे रुग्णालय नसल्याने कोविड-१९ महामारीच्या काळात महापालिकेने राज्य शासनाचे शासकीय प्रसूतीगृह रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले. तसेच शांतीनगर येथे असलेले खाजगी साई प्लॅटिनियम रुग्णालय दरमहा २० लाख रुपये किमतीला भाडेतत्वावर घेतले. तसेच वैद्यकीय अधिकारी, नर्स, वॉर्डबॉयसह इतर कर्मचारी व औषधांचा पुरवठा केला. याशिवाय तहसिल कार्यालयाची नवीन इमारत, पालिकेची अभ्यासिका, शाळा, रेडक्रॉस हॉस्पिटल, टाटा आमंत्रण इमारत, वेदांत कॉलेज इमारत आदी अनेक इमारती कोविड रुग्णालयाच्या उपचारासाठी महापालिकेने घेतल्या होत्या, कालांतराने रुग्णसंख्या कमी झाल्याने, काही मालमत्ता महापालिकेने परत केल्या. दरम्यान महापालिकेने कोणार्क रेसिडेंसी येथे स्वतःची लॅब सुरू असून कर्मचारी व डॉक्टर ठेक्या पद्धतीने आहेत.
रिजेन्सी अंटेलिया येथील बांधलेली जागा महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यावर येथे २०० बेडचे स्वतःचे अद्यावत रुग्णालय सुरू करण्यास महापालिका प्रशासनाने मान्यता दिली. रिजेन्सी अंटेलिया शिवाय दुसरीकडे असेच एक २०० बेडचे रुग्णालय उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे. अश्या ४०० बेड रुग्णालय व लॅब मधील साहित्य खरेदीसाठी तब्बल ११ कोटीचे साहित्य मागविण्यात येणार असून गुरवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात येणार आहे. मात्र साहित्याच्या किंमतीत मोठी तफावत असून एका बेडशिटची किंमत ६०० तर पिलोची किमत ९०० रुपये दाखविण्यात आली. तसेच पिलो कव्हर १८० रुपये आहे. याशिवाय आयसीयूचा एका बेडची किंमत १ लाख ४० हजार दाखविण्यात आली असून इतर साहित्याच्या किंमतीत मोठी तफावत आहे. सर्व साहित्य विना निविदा मागविण्यात येणार आहे.
महापालिकेचे रुग्णालयाचे स्वप्न पूर्ण
महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाले असून स्थानिक नागरिकांना अद्यावत आरोग्य सुविधा मिळणार असल्याची प्रतिक्रिया महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांनी दिली. रिजेन्सी अंटेलिया येथील रुग्णालयासह दुसरीकडे २०० खाटाचे रुग्णालय उभारण्यात येणार असून ४०० खाटाच्या रुग्णालय डोळ्या समोर ठेवून साहित्य मागविले आहे.४०० पैकी ६० खाटा आयसीयू असणार आहेत.