व्हील्स ॲण्ड बॅरल्स ग्रुपच्या प्रेरणादायी सायकलिस्ट म्हणून ११ सायकलिस्टचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:34 AM2021-02-08T04:34:59+5:302021-02-08T04:34:59+5:30
ठाणे : ठाणे, मुंबई, वसई, विरार, मीरा-भाईंदर या भागात कार्यरत असणाऱ्या व्हील्स आणि बॅरल्स या सायकलिंग ग्रुपच्या ११ ...
ठाणे : ठाणे, मुंबई, वसई, विरार, मीरा-भाईंदर या भागात कार्यरत असणाऱ्या व्हील्स आणि बॅरल्स या सायकलिंग ग्रुपच्या ११ सायकलिस्टचा मेडल व सर्टिफिकेट देऊन शनिवारी सत्कार करण्यात आला. यात ठाण्यातील अनेक सायकलिस्ट सहभागी झाले होते.
सायकलिंगची आवड जोपासणाऱ्यांना व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून जोडून त्यांनी केलेल्या सायकलिंगची माहिती सर्व सदस्यांना होण्यासाठी या समूहाची मदत होते.
या ग्रुपची सदस्यसंख्या जवळ जवळ १४०० ते १५००च्या आसपास आहे. ग्रुपच्या संचालकांपैकी चिराग शहा यांनी ग्रुप सदस्यांसाठी प्रेरणादायी असणाऱ्या सायकलिस्टचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्याची संकल्पना अंमलात आणली. यासाठी सायकलिंग करणारे व स्ट्राव्हा ॲपवर नोंदी ठेवणाऱ्या व २०२० या वर्षभरात जास्तीत जास्त किलोमीटर सायकलिंग करून इतरांना प्रेरणा देणाऱ्या सायकलिस्टची निवड केली. शनिवारी पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ (पीसीआरए)तर्फे हरित एवं स्वच्छ ऊर्जा ही संकल्पना जनमानसात रुजावी म्हणून सायकल रॅली आयोजित केली होती.
ही रॅली कॅडबरी जंक्शनपासून सुरू झाली. ती जुन्या ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ संपन्न झाली. त्यानंतर या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न झाला. जवळपास ३०० सायकलिस्ट यात सहभागी झाले होते. त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक व्हील्स ॲण्ड बॅरल्स या ग्रुपचे सायकलिस्ट सहभागी झाले होते. रॅलीच्या शेवटी या ग्रुपच्या प्रेरणादायी सायकलिस्ट म्हणून निवडलेल्या ११ सायकलिस्टचा मेडल व सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला. यासाठी ग्रुपमधील रेहाना शेख, रेणू राणे, अरुणा लागू या महिला सायकलिस्ट व राजेश पै, हरिहरन, मिलिंद गोगटे, प्रा. नारायण बारसे, ओमप्रकाश पांडे, हसमुख चौहान, प्रवीणकुमार कुलथे व सरबप्रीत नारू यांचा राष्ट्रीय दर्जाचे सायकलिस्ट सोनू गुप्ता यांच्या हस्ते मेडल व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
.........
फोटो मेलवर आहे...