११ किलो चरससह एकाला अटक, कल्याण पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 05:24 AM2019-01-06T05:24:52+5:302019-01-06T05:25:52+5:30
खंडणीविरोधी पथकाची कल्याणात कारवाई : २२ लाख किंमत
ठाणे : ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने बिहारमधून चरसविक्रीसाठी आलेल्या अजिमुद्दीन अहमद अन्सारी (५८) याला कल्याणातून शनिवारी दुपारी ११ किलो चरससह अटक केली. त्याच्याकडून २२ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला असून जप्त केलेला चरस नेपाळ येथून आणल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कल्याण रेल्वेस्थानकाजवळील दीपक हॉटेलसमोर एक जण चरसविक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून अन्सारी याला अटक केली. त्याच्याकडून २२ लाख ४०० रुपयांचा ११ किलो दोन ग्रॅम वजनाचा चरस तसेच रोख रक्कम व मोबाइल असा ऐवज हस्तगत केला आहे. पकडलेला चरस नेपाळमधून आणल्याची कबुली त्याने दिली असून याप्रकरणी महात्मा फुले चौकी पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) दोन (क) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक विकास घोडके, पोलीस उपनिरीक्षक विकास बाबर, संदेश गावंड, महाजन, पोलीस हवालदार एस.एस. मोरे, ए.ए. भोसले, पोलीस नाईक एच.ए. महाले, एस.व्ही. भांगरे, लाटे, बी.व्ही. मुकणे, एन.आर. मुंढे, पोलीस शिपाई जाधव या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंत ढोले करत आहेत.