मुंब्य्रातून ११ लाख ५० हजारांच्या बनावट नोटा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 09:58 PM2020-11-18T21:58:34+5:302020-11-18T22:04:12+5:30

कर्ज फेडण्यासाठी मुंब्य्रातील तरुणांनी भलताच ‘उद्योग’ सुरु केला. घरातच एका प्रिंटरवर बनावट भारतीय चलनी नोटा तयार करुन त्यांची विक्री करणाऱ्या मुजमिल मोहंमद साल्हे सुर्वे याच्यासह चौघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्यांनी आतापर्यंत १२ लाख रुपयांच्या नोटा छापल्या असून त्यातील ४५ हजार रुपये बाजारात वटविल्याचे पोलिसांना सांगितले.

11 lakh 50 thousand counterfeit notes seized from Mumbai | मुंब्य्रातून ११ लाख ५० हजारांच्या बनावट नोटा हस्तगत

ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई

Next
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई एक लाखांमध्ये दोन लाखांच्या बनावट नोटांची विक्रीचौघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लॉकडाऊनमुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी मुंब्य्रातील तरुणांनी भलताच ‘उद्योग’ सुरु केला. घरातच एका प्रिंटरवर बनावट भारतीय चलनी नोटा तयार करुन त्यांची विक्री करणाºया मुजमिल मोहंमद साल्हे सुर्वे (४०, रा. मुंब्रा), मुजफ्फर शौकत पावसकर (४१,अंधेरी, मुंबई), प्रवीण परमार (४३, साकीनाका, मुंबई) आणि नसरीन इम्तियाज काझी (४१, रा. मुंब्रा) या चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.
मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरातील दत्त पेट्रोलपंपाजवळ काहीजण भारतीय चलनातील दोनशे, पाचशे आणि दोन हजार रुपये दराच्या हुबेहुब वाटणाºया परंतू, बनावट नोटा वटविण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोथमिरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, उपनिरीक्षक रमेश कदम, संजय भिवणकर आणि पोलीस हवालदार नितीन ओवळेकर आदींच्या पथकाने सापळा लावून मुजम्मील सुर्वे याच्यासह चौघांना १८ नोव्हेंबर रोजी ११ लाख ४९ हजाराच्या बनावट नोटांसह अटक केली. जप्त केलेल्या नोटांमध्ये २००, ५०० आणि दोन हजारांच्या नविन नोटांचा समावेश आहे. या चौकडीकडे मिळालेल्या एका बॅगेमध्ये ११ लाख ४९ हजारांच्या बनावट नोटा मिळाल्या आहेत. परमार आणि मुजफ्फर यांनी या नोटांची मरोळ येथील घरी छपाई केली असून त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का? याचाही शोध घेण्यात येत असल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.
--------------------
कर्ज परतफेडीसाठी भलताच ‘उद्योग’
लॉकडाऊनच्या काळात कोणताच कामधंदा नसल्यामुळे सुरुवातीला परमार आणि मुजफ्फर यांनी दहा रुपयांची नोट एका प्रिंटरवर छापून ती वटविली. नतर दोन हजारांच्या नोटेची त्यांनी अशीच पडताळणी केली. त्यांनी आतापर्यंत १२ लाख रुपयांच्या नोटा छापल्या. त्यातील ४५ हजार रुपये बाजारात वटविल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांच्याकडून दोनशे रुपयांच्या १५, पाचशेच्या ९४८ तर दोन हजारांच्या ३३६ बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. प्रविण याने मुजफ्फर याच्या स्कॅनर प्रिंटरच्या सहाय्याने बॉन्ड पेपरचा वापर करुन या नोटा बनविल्या. त्या मुंब्रा, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात वटविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या चौघांनाही ठाणे न्यायालयाने २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

Web Title: 11 lakh 50 thousand counterfeit notes seized from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.