४६ लाखांची फसवणूक झालेल्या महिलेस सायबर पोलिसांनी मिळवून दिले ११ लाख ८० हजार
By धीरज परब | Published: February 28, 2024 05:55 PM2024-02-28T17:55:02+5:302024-02-28T17:55:26+5:30
पोलीस आयुक्तालयातील वसईच्या माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या अपर्णा शाह यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली होती.
मीरारोड - शेअरमध्ये भरपूर फायदा करून देण्याचे आमिष दाखवत वसईतील एका महिलेची ऑनलाईन ४६ लाख रुपयांच्या फसवणूक रक्कम पैकी ११ लाख ८० हजार रुपयांची रक्कम मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर क्राईम पोलीस ठाण्याने परत मिळवून दिली आहे.
पोलीस आयुक्तालयातील वसईच्या माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या अपर्णा शाह यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली होती. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवत शाह यांच्याकडून ऑनलाईन ४६ लाख रुपये सायबर लुटारूंनी उकळले होते. जानेवारी महिन्यात सदर फसवणुकीच्या अनुषंगाने मीरारोड येथील सायबर पोलीस ठाणे येथेशाह यांचा तक्रारी अर्ज मिळाला होता. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाणे येथे जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहायक निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर सह अमीना पठाण, कुणाल सावळे, माधुरी धिंडे, तसेच मसुबचे आकाश बोरसे व राजेश भरकडे यांनी गुन्ह्याचा तपास चालवला होता. नमूद तक्रारीबाबत दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली.
प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात वळती झाल्याचे दिसुन आले. त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधीत बँकेसोबत पत्रव्यवहार करुन संशयीत खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली. त्यानंतर न्यायालयाकडुन तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरीता सायबर पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांनी पाठपुरावा केला. न्यायालयाच्या आदेशा नंतर शाह यांच्या खात्यात त्यांची फसवणूक झालेल्या ४६ लाखांपैकी ११ लाख ८० हजार ३०८ रुपये परत मिळाले आहेत.