एमआयडीसीतील बंगल्यात आढळले ११ नाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:27 AM2021-06-26T04:27:38+5:302021-06-26T04:27:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : प्लांट ॲण्ड ॲनिमल वेलफेअर सोसायटी (पॉज) या प्राणिमित्र संस्थेच्या स्वयंसेवकांना बुधवारी एमआयडीसीतील एकाच बंगल्यात ...

11 snakes found in MIDC bungalow | एमआयडीसीतील बंगल्यात आढळले ११ नाग

एमआयडीसीतील बंगल्यात आढळले ११ नाग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : प्लांट ॲण्ड ॲनिमल वेलफेअर सोसायटी (पॉज) या प्राणिमित्र संस्थेच्या स्वयंसेवकांना बुधवारी एमआयडीसीतील एकाच बंगल्यात कोब्राची ११ पिल्ले आढळली. त्यापूर्वी संस्थेच्या हेल्पलाइनला गेल्या आठवड्यात रविवारी आलेल्या कॉलनुसार कोब्राची एक मादी आढळली होती. तिला जंगलात सोडण्यात आले. त्यानंतर आता त्याच बंगल्याच्या आवारात बुधवारी ११ पिल्ले वावरताना सापडली.

संस्थेचे स्वयंसेवक ऋषी सुरसे यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पिल्लांना एक-एक करत पकडायला सुरुवात केली. तासाभरातच ठिकठिकाणी असलेली पिल्ले बंगल्यात मिळाली. ही पिल्ले साधारण एक आठवड्याची असून ती एकाच मादीची असावीत, असा अंदाज वर्तवण्यात आला. बहुतेक गेल्या आठवड्यात ज्या मादीला जंगलात सोडले तिनेच घातलेल्या अंड्यांमधून ही पिल्ले जन्माला आली असण्याची शक्यता आहे, असे संस्थेचे संचालक नीलेश भणगे यांनी सांगितले.

एकाच वेळी विषारी नाग आढळल्यामुळे एमआयडीसीतील नागरिकांची चांगलीच गर्दी जमली होती. सर्व पिल्ले पकडून त्यांना सुखरूपपणे डोंबिवलीजवळच्या जंगलात पुनर्वसित केल्याचे ते म्हणाले. नाग हा एक विषारी साप आहे. नागाचा वावर मुख्यत्वे आशिया व आफ्रिका खंडातील उष्ण प्रदेशात आहे. डोंबिवलीतसुद्धा नाग आढळून येतो. ‘पॉज’ने २१ वर्षांत ६००च्या वर नागांचे पुनर्वसन केल्याचे प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले.

--------------

Web Title: 11 snakes found in MIDC bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.