पतंग पकडण्याच्या प्रयत्नात ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू ; इमारतीच्या गच्चीचा दरवाजा टाळे लावून बंद
By धीरज परब | Published: February 8, 2024 08:35 PM2024-02-08T20:35:55+5:302024-02-08T20:36:10+5:30
गच्चीवर पतंग पकडत असताना खाली पडून एका ११ वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे .
मीरारोड - गच्चीवर पतंग पकडत असताना खाली पडून एका ११ वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . मीरारोडच्या पूजा नगर मध्ये न्यू सरयु माता अपार्टमेंट मध्ये राहणारा ११ वर्षीय हमजा मुस्ताक कुरेशी हा मंगळवारी सायंकाळी इमारतीच्या गच्चीवर गेला होता . तीन मजली इमारतीच्या गच्चीवरून पडल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . परंतु डोक्याला जबर मार लागला असल्याने उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला . वास्तविक सदर इमारतीच्या गच्चीचा दरवाजा टाळे लावून बंद असतो . मात्र सध्या दुरुस्ती काम सुरु असल्याने गच्चीचे दार उघडे होते .
हमजा हा पतंग पकडून गोळा करायचा . त्या दिवशी सुद्धा तो गच्चीवर गेला असताना कामगारांनी त्याला खाली पाठवले होते . मात्र त्यांची नजर चुकवून तो पुन्हा गच्चीवर पोहचला . पतंग पकडण्याच्या नादात तोल जाऊन तो खाली पडला असे सूत्रांनी सांगितले . या प्रकरणी नया नगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे . घटनेच्या काही काळ आधी तो अन्य मुलांसह सायकल चालवताना सीसीटीव्ही मध्ये दिसून आला होता .