उत्तन येथे ११ वर्षांचा मुलगा बुडाला
By admin | Published: June 30, 2017 02:51 AM2017-06-30T02:51:32+5:302017-06-30T02:51:32+5:30
उत्तनच्या पाली येथील जेट्टीवर खेळत असताना मोठ्या लाटेत ११ वर्षांचा मुलगा समुद्रात बुडाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : उत्तनच्या पाली येथील जेट्टीवर खेळत असताना मोठ्या लाटेत ११ वर्षांचा मुलगा समुद्रात बुडाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. समुद्राला आलेली भरती व उसळणाऱ्या लाटांमुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.
पाली समुद्रकिनारी बांधलेल्या जेट्टीवर दुपारच्या सुमारास लहान मुले नेहमीच खेळत असतात. लाटा जेट्टीला आदळून उडणाऱ्या पाण्याच्या शिंतोड्यात भिजत मजा करतात. गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणेच चार मुले जेट्टीवर खेळत होती. भरती असल्याने खवळलेल्या समुद्रात मोठ्या लाटा उसळत होत्या. साडेतीनच्या सुमारास सहावीत शिकणारा हर्षवर्धन गणेश बुरूड (११) हा मुलगा लाटेसोबत वाहून गेला. तो बुडाल्याची माहिती मिळताच पालिकेच्या उत्तन अग्निशमन दलाचे अधिकारी रवींद्र पाटील हे पाच जवानांसह घटनास्थळी गेले. शिवाय, उत्तन सागरी पोलीस व स्थानिक नगरसेवक बर्नड डिमेलोदेखील आले. लाटांमुळे हर्षवर्धनचा शोध घेणे अवघड झाले आहे. स्थानिक मच्छीमारही शोध घेत आहेत.