आदिवासी महामंडळाची ११० कोटींची भातखरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:38 AM2021-03-25T04:38:42+5:302021-03-25T04:38:42+5:30
वासिंद : आदिवासी विकास महामंडळअंतर्गत ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात पाच लाख ९३ हजार क्विंटल भातखरेदी झाली असून, या ...
वासिंद : आदिवासी विकास महामंडळअंतर्गत ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात पाच लाख ९३ हजार क्विंटल भातखरेदी झाली असून, या भातखरेदीची किंमत ११० कोटी ६२ लाख ८९ हजार ५१३ रुपये आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत आधारभूत खरेदी योजना हंगाम अंतर्गत ही खरेदी झाली आहे.
यंदा भातकापणी हंगामात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले. त्यातच शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या धान्यापैकी थोडेफार घरी खावटीसाठी ठेवून उरलेल्या भाताची महामंडळाच्या केंद्रावर विक्री केली. आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार मुख्य प्रादेशिक कार्यालयांतर्गत ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शहापूर, विक्रमगड, मनोर, कासा, मोखाडा असे पाच उपप्रादेशिक कार्यालये असून यामध्ये एकूण ३९ खरेदी केंद्र आहेत. या केंद्रांवर भातखरेदी सुरू असून ती ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
सध्या खरेदी झालेल्या भातखरेदीमध्ये ठाणे जिल्ह्यात तीन लाख तीन हजार ७७७ क्विंटल, तर पालघरमध्ये दोन लाख ८० हजार क्विंटल भातखरेदी झाली आहे. ठाणे, रायगडची ५८ कोटी ५९ लाख ४९ हजार ५१३ रुपये तर पालघर जिल्ह्याची ५२ कोटी तीन लाख ४० हजार अशी मिळून ११० कोटी ६२ लाख ८९ हजार ५१३ रुपये असल्याचे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे व उपप्रादेशिक व्यवस्थापक ए.वी. वसावे यांनी सांगितले.