डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांसाठी ११० कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:35+5:302021-06-03T04:28:35+5:30
कल्याण : डोंबिवली निवासी आणि औद्योगिक विभागातील रस्त्यांकरिता ११० कोटींचा निधी मंजूर झाल्याने या भागातील रस्ते विकासाचा मार्ग मोकळा ...
कल्याण : डोंबिवली निवासी आणि औद्योगिक विभागातील रस्त्यांकरिता ११० कोटींचा निधी मंजूर झाल्याने या भागातील रस्ते विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. या कामाच्या निविदाही लवकर काढणार असल्याची माहिती कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे गोपाळ लांडगे, सदानंद थरवळ, प्रकाश म्हात्रे, दीपेश म्हात्रे, विश्वाथ राणे, विनिता राणे, राजेश मोरे, राजेश कदम आदी उपस्थित होते.
डोंबिवली निवासी आणि औद्योगिक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. २७ गावे महापालिकेतून वगळणे आणि पुन्हा समाविष्ट करणे यामुळे या भागातील रस्त्यांच्या विकासाला अडसर होता. यासाठी औद्योगिक विकास महामंडळासह महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून रस्त्यांची दुरुस्ती आणि कॉंक्रिटीकरण रखडल्याची बाब दोन्ही संस्थांच्या निदर्शनास आणून दिली. जानेवारी महिन्यात महामंडळाचे कार्यकारी अभियंता डॉ. पी. अनबलगन यांच्यासोबत बैठक पार पडली होती. महापालिका आणि महामंडळ रस्ते विकासासाठी प्रत्येकी ५० टक्के खर्च करणार आहे. औद्योगिक भागातील फेज वनमध्ये १० किलोमीटर आणि फेज टूमध्ये ११ किलोमीटर आणि निवासी वसाहतीमधील १३ किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे होणार आहेत. महापालिकेने ४० टक्के रस्त्यासाठी निविदा काढल्यावर महामंडळाकडून ६० टक्के कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यानुसार महापालिका ५५ कोटी १५ लाख रुपयांचा निधी महामंडळाकडे वर्ग करणार आहे. तसा प्रस्तावही महापालिकेने महासभेत यापूर्वीच मंजूर केला आहे, तर महामंडळाकडून पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत ५७ कोटी ३७ लाख रुपये अनुदान स्वरूपात देण्याचे आदेश दिले आहेत.
नगरविकासकडून १५ कोटींचा निधी मंजूर
महापालिका हद्दीतील पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी नगरविकास खात्याने १५ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या विकास कामांचे प्रस्ताव महापालिकेने सादर केले आहे. त्यानुसार या कामाच्या निविदा काढून त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी विकासासाठी देऊ केला आहे.
----------------