प्राच्यविद्या अभ्यास संस्थेला अमेरिकन संशोधकाकडून ११०० ग्रंथांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 03:53 PM2021-08-04T15:53:37+5:302021-08-04T15:54:30+5:30

आबोट हे विद्याप्रसारक मंडळ संचलित जोशी-बेडेकर महाविद्यालयात २०१९ साली आयोजित भारतीय तत्वज्ञानावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादात सहभागी झाले होते.

1100 texts donated by an American researcher to the Institute of Oriental Studies | प्राच्यविद्या अभ्यास संस्थेला अमेरिकन संशोधकाकडून ११०० ग्रंथांची भेट

प्राच्यविद्या अभ्यास संस्थेला अमेरिकन संशोधकाकडून ११०० ग्रंथांची भेट

Next

ठाणे : प्राच्यविद्या अभ्यास संस्थेला अमेरिकन संशोधकाकडून ११०० ग्रंथांची भेट प्राच्यविद्या अभ्यास संस्थेकरिता देण्यात आली. प्रसिद्ध अमेरिकेन मानसोपचारतज्ञ, कवी, संगीतकार फ्रँकलिन आबोट यांनी ही भेट दिली असून यात मानसशास्त्र, धर्म, तत्वज्ञान, कलाईतिहास, प्राच्यविद्या, पर्यटन फोटोग्राफी, संगीत, साहित्य, इतिहास, भूगोल इत्यादी विषयांच्या ग्रंथांचा यात सहभाग आहे. 

आबोट हे विद्याप्रसारक मंडळ संचलित जोशी-बेडेकर महाविद्यालयात २०१९ साली आयोजित भारतीय तत्वज्ञानावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादात सहभागी झाले होते. त्यांच्या या भेटीत त्यांनी विद्या प्रसारक मंडळाच्या संकुलातील शैक्षणिक संस्थाचे कार्य जाणून घेतले. जोशी बेडेकर महाविद्यालयात सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांना मिळाल्याने ते अतिशय प्रभावित झाले होते. याच परिसंवादादरम्यान त्यांनी या महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला देखील भेट दिली होती.

अमेरिकेत परत गेल्यानंतर त्यांनी या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.  सुचित्रा नाईक, ग्रंथपाल नारायण बारसे आणि प्रा. डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांच्या संपर्कात राहून आपल्याकडील संशोधनासाठी उपयोगी ग्रंथसंपदा विद्या प्रसारक मंडळाला देणगीदाखल देण्याची इच्छा व्यक्त केली. कोविड समस्येमुळे यासाठी थोडा उशीर होत होता, पण संबंधितांशी अनेकदा इमेल द्वारे संपर्कात राहून त्यांनी स्वखर्चाने आपल्या संग्रहातील ११०० उपयुक्त ग्रंथ ठाणे येथे अलीकडेच पोहोच केले. 

 स्पिरीट ऑफ ऐशिया, द कम्पलीट बुक ऑफ स्क्रिप्टराइटिंग,क्राफ्ट ऑफ कश्मिर जम्मू ऐण्ड लदाख, फोक सॉंग्स ऑफ द वर्ल्ड, महाराजा रंजीत सिंग अँज पेट्रोन ऑफ द आर्ट्स, मैजिक बॉल्स, पोयेट्स इन देयर यूथ, द गार्डन ऑफ लाईफ, अँन ईन्ट्रोडक्शन टू द हिलींग प्लान्ट्स, अ डिस्टेंट मिरर, वास्तु, द एनसाक्लोपिडिया ऑफ साईन्स अँड सिंम्बॉल्स, मोशनलेस जर्नी फ्रॉम अ हेर्मिटेज ईन द हिमालयास, अ हिस्ट्री ऑफ फार ईस्टर्न आर्ट, आर्ट ऑफ ऐशिया,  पैराडाईज ऑन द अर्थ इत्यादी अतिशय महत्वपूर्ण ग्रंथांचा यात समावेश आहे. 

आबोट यांनी पाठवलेली ग्रंथसंपदा ठाण्यात आल्यानंतर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचे संचालक डॉ. विजय बेडेकर यांनी या सर्व संग्रहाचे अभ्यासपूर्ण अवलोकन केले. या ग्रंथसंपदेची विषयव्याप्ती आणि संशोधनमूल्य लक्षात घेऊन ही ग्रंथसंपदा विद्यार्थी, इतिहास संशोधक, प्राच्यविद्या संशोधक तसेच विविध विषयात एम फील आणि विद्यावाचस्पती अभ्यासासाठी अतिशय महत्वपूर्ण असल्याचे डॉ बेडेकर याच्या लक्षात आले आणि म्हणूनच  संपूर्ण ठाणेकर वाचक संशोधकांना ही ग्रंथसंपदा  खुली करून देण्याच्या उद्देशाने डॉ बेडेकर यांनी प्राच्यविद्या आभ्यास संस्थेच्या ग्रंथालयात एक विशेष संग्रह दालन करण्याचे ठरवले आणि त्यासंदर्भात आपल्या मार्गदर्शनाखाली काम सुरु केले. 

ठाण्याच्या प्राच्य विद्या अभ्यास संस्थेत ही ग्रंथसंपदा सर्व अभ्यासकांसाठी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल असे विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी सांगितले आहे. त्याच बरोबर लवकरच प्राच्यविद्या अभ्यास संस्थेच्या वतीने या ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात येईल असेही डॉ. विजय बेडेकर यांनी सांगितले.

Web Title: 1100 texts donated by an American researcher to the Institute of Oriental Studies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.