ठाण्यात वर्षभरात १११ इम्पोर्टेड गाड्या; शासकीय तिजोरीत १२७० कोटींचा कर जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 03:36 AM2018-02-15T03:36:18+5:302018-02-15T03:36:24+5:30
सर्वसामान्य माणूस स्वप्नातच गाडी खरेदी करण्याचे स्वप्न पाहतो. दुसरीकडे अशी काही माणसे आहेत, जी लाखो नाही तर करोडो रुपयांच्या गाड्या खरेदी करतात. अशाप्रकारे, ठाण्यात गेल्या वर्षात तब्बल १११ इम्पोर्टेड गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे.
ठाणे : सर्वसामान्य माणूस स्वप्नातच गाडी खरेदी करण्याचे स्वप्न पाहतो. दुसरीकडे अशी काही माणसे आहेत, जी लाखो नाही तर करोडो रुपयांच्या गाड्या खरेदी करतात. अशाप्रकारे, ठाण्यात गेल्या वर्षात तब्बल १११ इम्पोर्टेड गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. या गाड्या आयात झाल्यावर गाडीमालकांकडून आयात करापोटी ठाणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाने तब्बल १२७० कोटींचा निधी वसूल केला आहे. अशा प्रकारे आलिशान गाड्यांमुळे ठाणे शहराची ओळखही हळूहळू बदलत असल्याचे दिसते. यामध्ये चारचाकी गाड्याच नाहीतर दुचाकींची संख्याही जवळपास समसमान असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एकीकडे ठाणे स्मार्ट होत असताना त्याच इम्पोर्टेड दुचाकी आणि चारचाकी गाड्या खरेदी करून ठाणेकर नागरिकही स्मार्ट होत असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरात तब्बल १११ इम्पोर्टेड गाड्या ठाणेकरांनी खरेदी केल्या आहेत. त्यामध्ये ५३ दुचाकी आणि ५८ चारचाकींचा समावेश आहे. तसेच खरेदी केलेल्या गाड्यांमध्ये मर्सिडिझ बेन्झ, बेन्टली, बीएमडब्ल्यू, पोर्श, रेंज रोव्हर, आॅडी, फेरारी, मेबॅक ते अगदी रोल्स रॉइसपर्यंतच्या महाग गाड्या ठाण्यात दिसत आहेत. त्यातील सर्वात महाग गाडीची किंमत साडेचार कोटींच्या घरात असल्याची माहिती आरटीओ सूत्रांनी दिली आहे.
रोल्स रॉइसचे घोस्ट हे चार कोटी दोन लाखांचे मॉडेल आणि त्याचबरोबर बेन्टली ही ४ कोटींची गाडी ठाण्यात पाहण्यास मिळत आहे. तसेच १ ते २ कोटींच्या १३ गाड्या असून ८० लाखांच्या २७ गाड्या आहेत.
५० लाखांच्या १२ गाड्या
५० लाखांपर्यंतच्या १२, ४० लाखांपर्यंतच्या १९ आणि १० लाखांहून अधिक किमतीच्या २२ अशा १११ इम्पोर्टेड गाड्या ठाणेकरांनी खरेदी केल्या. त्यांच्या आयात शुल्कापोटी १,२७० कोटींचा निधी वसूल केल्याची माहिती आरटीओ सूत्रांनी दिली.